
वॉशिंग्टन/मॉस्को/लंडन : संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरस, अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी बुधवारी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि दोन्ही देशांतील शत्रुत्व लवकरच संपेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारताच्या सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान-व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या मजबूत ठिकाणांसह एकूण ९ दहशतवादी लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
भारत-पाकिस्तानने "कमाल लष्करी संयम" बाळगावा असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरस यांनी सांगितले. जग भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष परवडवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “लाजिरवाणी बाब आहे. अनेक दशके नाही, तर शतके या लढाया चालू आहेत. मला फक्त इतकेच वाटते की हे सगळे लवकरच संपावे.
संयम बाळगा, चीनची अपेक्षा
जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (UAE), बांगलादेश, चीन, तुर्की, कतार, आणि जपान यांसारख्या देशांनी देखील दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. त्यांनी सामान्य नागरिकांचे संरक्षण आणि दक्षिण आशियात स्थैर्य राखण्यावर भर दिला.
रशियाला चिंता
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी म्हटले की, "पहलगामजवळील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाबद्दल आम्ही गंभीरपणे चिंतित आहोत." त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि शिमला करार (१९७२) व लाहोर घोषणापत्र (१९९९) च्या आधारे शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले.
संवादासाठी ब्रिटन प्रयत्नशील
ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवादासाठी आपण दोघांशी संपर्कात आहोत. परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी दोन्ही देशांनी थेट संवाद साधून तणाव कमी करावा असे सांगितले. व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी ही परिस्थिती "अत्यंत चिंताजनक" असल्याचे म्हटले.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले, “दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा भारताचा निर्णय योग्य आहे. दहशतवाद्यांना मोकळीक देऊ नये.” स्कॉटलंडचे पहिले मंत्री जॉन स्विन्ने यांनीही शांतता आणि संवादाचे आवाहन केले.
स्थिती गंभीर -जपान
जपानचे कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी म्हटले की, “दहशतवादी हल्ल्यानंतरची ही स्थिती गंभीर आहे. अधिक हिंसा झाली तर संपूर्ण युद्ध पेटू शकते. भारत आणि पाकिस्तानने संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणावी.”