

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या लष्करी संघर्षात मध्यस्थी केल्याच्या दावा चीनने केला त्याला आता पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, भारताने मात्र अनेक वेळा दोन देशांमधील संघर्षावेळी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालय प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनचे नेते पाकिस्तान नेतृत्वाच्या ‘सातत्याने संपर्कात होते’ आणि ६ ते १० मे या तीन, चार दिवसांत आणि कदाचित त्यापूर्वी आणि नंतरही भारतीय नेतृत्वाशी संपर्क साधला होता.
वांग यांचा दावा
शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारला आहे. संघर्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा आण्विक प्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, यासारखे प्रश्न सोडवले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील समस्या आणि कंबोडिया आणि थायलंडमधील संघर्षात मध्यस्थी केली, असा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला.
त्यानंतर शस्त्रविराम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष सोडवण्याचे श्रेय सातत्याने घेतले. मात्र भारताने दोन देशांमधील संघर्ष सोडवण्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी किंवा हस्तक्षेप असल्याचा दावा वारंवार फेटाळून लावला. भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की, भारताने केलेल्या कारवाईत प्रचंड नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी भारताच्या समकक्षांना फोन केला आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर एकमत झाले.
पाकिस्तानच्या या दाव्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण भारताबरोबर झालेल्या त्या चार दिवसांच्या संघर्षात शस्त्रविराम घडवून आणण्यासाठी चीनने मध्यस्थी केल्याचा उल्लेख पाकिस्तानने पहिल्यांदाच केला आहे. यापूर्वी पाकिस्तानने संघर्ष थांबवल्याचे श्रेय फक्त ट्रम्प यांना दिले होते.