भारत-पाक तणाव वाढला; ७ राज्यांतील २७ विमानतळे १० मेपर्यंत बंद

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढल्यामुळे उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील ७ राज्यांमधील एकूण २७ एअरपोर्ट शनिवारी (दि. १० मे) पहाटे ५:२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढल्यामुळे उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील ७ राज्यांमधील एकूण २७ एअरपोर्ट शनिवारी (दि. १० मे) पहाटे ५:२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. प्रवाशांनी त्यांच्या विमानाच्या उड्डाण वेळेबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विमानतळांवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.

विमान कंपन्यांनी मार्ग बदलले

गुरुवारी पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अजूनच वाढला. परिणामी गुरूवारी भारतीय विमान कंपन्यांनी सुमारे ४३० उड्डाणे (सुमारे ३ टक्के) रद्द केली. पाकिस्तानी विमान कंपन्यांनीही सुमारे १४७ उड्डाणे (१७ टक्के) रद्द केली. Flightradar24 या जागतिक फ्लाइट ट्रॅकिंग सेवेनुसार, गुरुवारी काश्मीरपासून गुजरातपर्यंत भारताच्या पश्चिमी हद्दीत आणि पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात नागरी उड्डाणे जवळपास पूर्णपणे बंद झाली होती. विमान कंपन्यांनी मार्ग बदलल्यामुळे हे हवाई क्षेत्र जवळपास रिकामे होते.

भारतात बंद ठेवण्यात आलेल्या विमानतळांची यादी:

  • श्रीनगर

  • जम्मू

  • लेह

  • चंदीगड

  • अमृतसर

  • लुधियाना

  • पटियाला

  • भटिंडा

  • हलवारा

  • पठाणकोट

  • भुंतर

  • शिमला

  • गग्गल

  • धर्मशाळा

  • किशनगड

  • जैसलमेर

  • जोधपूर

  • बिकानेर

  • मुंद्रा

  • जामनगर

  • राजकोट

  • पोरबंदर

  • कांडला

  • केशोड

  • भुज

  • ग्वाल्हेर

  • हिंडन

तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही

लष्करी चार्टरसाठी वापरल्या जाणाऱ्या काही विमानतळांचाही यात समावेश आहे. तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही दिसून येत आहे. अमेरिकन एअरलाइन्सने दिल्ली ते न्यूयॉर्क हे उड्डाण रद्द केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in