
नवी दिल्ली : पहलगाम येथे २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि त्यांचे आश्रयदाते असलेल्या पाकिस्तानवर भारताने बुधवारी मध्यरात्री कठोर सूड उगवला. भारतीय सशस्त्र दलांच्या जवानांनी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हवाई हल्ला केला व २४ क्षेपणास्त्रे डागत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे केलेल्या कारवाईत २६ दहशतवादी ठार व ४६ जखमी झाल्याचे समजते.
आपल्या माता-भगिनींना स्वत:च्या डोळ्यादेखत कपाळावरील कुंकू पुसले जात असल्याचे पाहावयास लागले होते. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' असे भावनिक नाव देण्यात आले आणि ‘चुटकीभर सिंदूर’ची किंमत काय असते, ते जवानांनी दाखवून दिले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत १०० हून अधिक जण ठार झाले, तर जैश-ए-मोहम्मदचे ४, लष्कर-ए-तोयबाचे ३ आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचे २ असे एकूण नऊ तळ उद्ध्वस्त केले, असा दावा भारतातर्फे करण्यात आला.
बुधवारी सकाळी या हल्ल्याचे वृत्त समजताच भारतात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला आणि भारतीय जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. बुधवारी मध्यरात्री सुनियोजित पद्धतीने ही कारवाई १ वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली आणि अवघ्या २५ मिनिटांमध्ये म्हणजे १ वाजून ३० मिनिटांनी फत्ते झाली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापासून ते पहलगाम हल्ल्यापर्यंतच्या सर्व हल्ल्यांचा बदला भारताने एकाच कारवाईत घेतला.
स्कॅल्प आणि हॅमरचा वापर
पाकवरील हल्ल्यात भारताने वापरलेली दोन प्रमुख शस्त्रास्त्रे म्हणजे स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र आणि हॅमर स्मार्ट बॉम्ब प्रणाली. या एअरस्ट्राईकसाठी ही दोन्ही शस्त्रे राफेल लढाऊ विमानांवर बसवण्यात आली होती. खोलवर मारा, ४५० किमीपर्यंत रेंज असलेले स्कॅल्प क्रुझ मिसाईल हे क्षेपणास्त्र रात्री आणि कुठल्याही हवामानात वापरता येते. हे क्षेपणास्त्र कमी उंचीवरून उडत असल्याने रडारला सहजासहजी सापडत नाही. पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरिदकेतील जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबाच्या तळांवर याच क्षेपणास्त्रांनी दूरवरून मारा करण्यात आला. हॅमर स्मार्ट बॉम्ब प्रणालीत ७० किमीपर्यंतच्या रेंजमध्ये टार्गेटवर अचूक मारा करण्याची क्षमता असून ते जॅमिंगपासून सुरक्षित, कमी उंचीवरून लाँच करता येते.
पाकिस्तानने लष्कराला दिले प्रतिहल्ल्याचे अधिकार
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराने सरकारकडे भारताला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व अधिकार देण्याची मागणी केली. यावर पाकिस्तान सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. पाकिस्तान सरकारने बुधवारी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली व पाकिस्तानी सशस्त्र दलांना भारतावर आवश्यक कारवाई कऱण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी लष्कर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर देईल, अशी दर्पोक्ती केली जात आहे.
भारताने युद्ध भडकवले, पाकिस्तानचा कांगावा
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत भारताच्या हल्ल्याला पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले गेले आहे. शाहबाज म्हणाले की, या कृतीने भारताने आपल्याला युद्धासाठी चिथावणी दिली आहे. या बैठकीला लष्करप्रमुख, आयएसआय प्रमुख आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
देशभरातील १८ विमानतळ तात्पुरते बंद
भारत-पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरातील २०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील श्रीनगरसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरून आपल्या सेवा रद्द केल्या आहेत. या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अभी पिक्चर बाकी है!
'ऑपरेशन सिंदूर'मुळे आधीच पाकिस्तान बिथरलेला असताना आता भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी 'अभी पिक्चर बाकी है' म्हटल्याने पाकिस्तानचे टेन्शन आणखी वाढले आहे. जर, पाकिस्तानने भारतातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, तर असे आणखी हल्ले शक्य आहेत, असे सूचक संकेत त्यांनी दिले.
मोदींचा युरोप दौरा रद्द
भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोपमधील तीन देशांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदी १३ मे ते १७ मे या कालावधीत क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलॅण्डसच्या दौऱ्यावर जाणार होते.
निमलष्करी दलातील जवानांच्या सुट्ट्या रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलाच्या प्रमुखांना पाचारण करून जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यास सांगितले. गृहमंत्र्यांनी देशांतर्गत सुरक्षेचाही आढावा घेतला आणि उच्चपदस्थ सुरक्षा अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्याही सूचना दिल्या.
मसूद अझरच्या कुटुंबातील १० जणांचा खात्मा
भारताच्या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अझरच्या कुटुंबाचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० जण तसेच निकटवर्तीय असलेले ४ साथीदारही हल्ल्यात ठार झाले आहेत. या हल्यात मसूद अझरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे, तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचाही समावेश आहे.
नीलम-झेलम धरण उडवले
माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील ९ ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पाकमधील नीलम नदीच्या नीलम-झेलम धरणावर बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान येथे वीजनिर्मिती करतो. नीलम व्हॅली भारतीय सीमेपासून फक्त 3 किमी अंतरावर आहे. हा भाग पाकव्याप्त काश्मीरचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील नीलम व्हॅली परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे.