
नवी दिल्ली : भारतासोबत सुरू असलेल्या तणावानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला. त्यानंतर, भारत हा करार एकतर्फी रद्द करू शकत नाही, या कराराची मध्यस्थी करणारी जागतिक बँक भारताला करार स्थगित करण्याचा निर्णय बदलण्यास भाग पाडेल, असे पाकिस्तानच्या तज्ज्ञांचे म्हणणे होते. मात्र, आता जागतिक बँकेने पाकिस्तानला धक्का देत जाहीरपणे भारताची बाजू घेतली आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मात्र, बंगा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हा करार दोन्ही देशांमधील आहे. जागतिक बँकेची भूमिका केवळ वाद सोडवण्यासाठी तटस्थ तज्ज्ञ किंवा मध्यस्थी म्हणून असते. द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये मध्यस्थाव्यतिरिक्त संस्थेची कोणतीही भूमिका नाही.
दरम्यान, याबाबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाकिस्तान अनेक वर्षांपासून अडथळे निर्माण करत होता. आम्ही त्यांना अनेक पत्रे पाठवली, ज्यात करारातील सुधारणांवर वाटाघाटी करण्याची विनंती केली होती. भारताने सहा दशकांहून अधिक काळ या कराराचा आदर केला आहे, पण पाकिस्तान नेहमी या कराराचे उल्लंघन करायचा, त्यामुळे भारताला सिंधू पाणी करार स्थगित करावा लागला.