
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी तातडीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी आणखी एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तत्काळ हुसकावून लावा, असा सूचनावजा आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. ही यादी लवकरात लवकर केंद्राला पाठवावी, म्हणजे त्यांचे व्हिसा तत्काळ रद्द करता येतील आणि त्यांना भारताबाहेर पाठवता येईल, असेही केंद्राने म्हटले.
केंद्र ॲक्शन मोडमध्ये
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. सध्या पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जवानांकडून दहशतवादविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली व पाकिस्तानी नागरिकांना शोधून तत्काळ परत पाठवा, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेल्या सर्व व्हिसा सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय २४ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.
४८ तासांत महाराष्ट्र सोडा, अन्यथा कायदेशीर कारवाई - फडणवीस
पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द झाला असून महाराष्ट्रातील पाक नागरिकांनी पुढील ४८ तासांत देश सोडावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
राज्यातील १८ हजार पाकिस्तानी परतीच्या मार्गावर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सध्या राज्यात १८ हजार पाकिस्तानी नागरिक व्हिसावर आले आहेत. यापैकी ७ हजार नागरिक मुंबई परिसरात आहेत. या नागरिकांनी भारत सोडला की नाही याची पडताळणी स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे.
वेगवेगळ्या कारणांसाठी पाकिस्तानी नागरिक भारतात येत असतात. यात दीर्घकालीन व्हिसापासून अल्पकालीन व्हिसाचा समावेश असतो. शिक्षण, वैद्यकीय उपचार यासाठी दीर्घकालीन व्हिसा घेतला जातो, तर पर्यटनासाठी अल्पकालीन व्हिसा दिला जातो. सध्या महाराष्ट्रात एकूण १८ हजार पाक व्हिसाधारक आहेत. त्यात विद्यार्थी, रुग्ण, पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी मुंबई महानगरात सात हजार पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दीर्घकालीन व्हिसावर भारतात रहात असलेल्या पाकिस्तानी हिंदूंना मात्र ४८ तासांत देश सोडण्याचा नियम लागू होणार नाही.
सिंधू नदीचे पाणी रोखण्याची अंमलबजावणी तीन टप्प्यात
नवी दिल्ली : पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, असा निर्धार भारताने केला आहे. सिंधू पाणी करार स्थगितीच्या निर्णयाची अंमलबजावणी तीन टप्प्यात केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी केंद्रीय जलशक्ती खात्याची शुक्रवारी एक बैठक झाली. यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले की, आम्ही तीन प्रकारची रणनीती बनवत आहोत. त्यामुळे पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.