
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत पाकविरुद्ध कठोर कारवाईच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. केंद्र सरकारने बुधवारी पाकमधील दहशतवादी संघटनांच्या जगभरातील कारवाईचा लेखाजोखा जाहीर केला. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द झाल्याची माहिती रशियन सरकारने जाहीर केली हेही विशेष. यामुळे पाकिस्तानभोवतीचा फास चहूबाजूंनी आवळून भारत जोरदार कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मोदींनी बुधवारी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी ‘रॉ’ प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी.एम. सिन्हा, माजी दक्षिण विभाग लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी या मंडळात आहेत. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत. सात सदस्यांच्या मंडळात बी. वेंकटेश वर्मा हे निवृत्त आयएफएस आहेत.
पाकच्या कारनाम्यांची माहिती भारताकडून जाहीर
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी आतापर्यंत भारतासह जगभरात कसे घातक दहशतवादी हल्ले केले आहेत याची माहिती भारताने बुधवारी जाहीर केली. याद्वारे पाकिस्तानचा दहशतवादाला कसा छुपा पाठिंबा आहे याची पोलखोल भारताने केली आहे. याद्वारे पाकिस्तानला जगभरात एकटे पाडण्याचा प्रयत्न भारताने सुरू केला आहे.
पाक जवानांनी चौक्या सोडल्या, झेंडेही हटविले
भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी सीमारेषेजवळील चौक्या रिकाम्या केल्या असून चौक्यांवरील झेंडेही उतरवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ अध्यक्षपदी आलोक जोशी
पहलगाममधील दहशतवाद हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्व दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असतानाच बुधवारी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे. रिसर्च अॅण्ट ॲनालिसिस विंगचे (रॉ) माजी प्रमुख आलोक जोशी यांची मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या मंडळामध्ये आणखी सहा जणांचाही समावेश करण्यात आला आहे.
पाकसाठी भारताचे हवाई क्षेत्र बंद
बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. यामुळे आता पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांना २३ मेपर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येणार नाही. भारताने पाकिस्तानातील हवाई दलाच्या जवानांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, जर कोणतेही विमान भारतीय क्षेत्रात प्रवेश करत असेल तर त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यापूर्वी पाकिस्तानने २३ एप्रिल रोजी भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता.