भारत-पाक तणाव कमी, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच? वायूदलाने दिली सविस्तर माहिती

अमेरिकेच्या मध्यस्थीने पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोघांनीही काल (१० मे) युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीच्या अटी मोडत पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात गोळीबार सुरू केला. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाने केलेल्या एका महत्त्वपूर्ण ट्विटमुळे नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
भारत-पाक तणाव कमी, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच? वायूदलाने दिली सविस्तर माहिती
Published on

नवी दिल्ली : पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिले. अमेरिकेच्या मध्यस्थीने पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोघांनीही काल (१० मे) युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीच्या अटी मोडत पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात गोळीबार सुरू केला. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाने केलेल्या एका महत्त्वपूर्ण ट्विटमुळे नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

भारतीय वायूदलाने आज (११ मे) सकाळी ट्विट करत स्पष्ट केले की, "ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू आहे."

ऑपरेशन सिंदूर सुरूच?

भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत अचूकता आणि व्यावसायिकतेने पूर्ण करण्यात आल्या आहेत. या मोहिमा राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांशी सुसंगत, काळजीपूर्वक आणि नियोजनपूर्वक राबवण्यात येत आहेत. सध्या ऑपरेशन्स सुरू असल्याने, त्याबाबत सविस्तर माहिती योग्य वेळी दिली जाईल, असेही वायूदलाने नमूद केले.

पाकिस्तानकडून विश्वासघात

भारताने शांततेसाठी युद्धबंदी स्वीकारली असली, तरी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे विश्वासघात करत पुन्हा गोळीबारास सुरुवात केली. या कृतीमुळे भारताने पूर्वीच दिलेली ताकीद — "पुन्हा हल्ला झाला तर युद्ध सुरू होईल" — आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वायूदलाचे आवाहन

सध्याच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये भारतीय वायूदलाने नागरिकांना आणि माध्यमांना खोटी किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे. ऑपरेशन्सबाबत अधिकृत माहिती वेळोवेळी देण्यात येईल, असं वायूदलाने स्पष्ट केलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in