
राजौरी-पुंछ : भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून 'एलओसी'वरील रहिवासी भागांना आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील (LoC) सीमाभागातील गावांवर अंधाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचा भीषण मारा केलाय. यामध्ये किमान १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात चार लहान मुले आणि एका सैनिकाचाही समावेश आहे. तब्बल ५७ जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सीमेवरील गावांमध्ये भीतीचे वातावरण, लोक बंकरमध्ये
पुंछ व राजौरी तसेच उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला व कुपवाडा या भागांमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक हल्ले होत असून सीमावर्ती रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेकडो रहिवाशांना जमिनीखालील बंकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात घरं, वाहने आणि गुरुद्वाऱ्यासह अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
पुंछमध्ये सर्वाधिक हानी; एकाच जिल्ह्यात १३ मृत्यू
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुंछ जिल्ह्यातच सर्व १३ मृत्यू झाले. जखमींमध्ये ४२ जणांचा समावेश असून, त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बालाकोट, मेंढर, मंकोट, कृष्णा घाटी, गुलपूर, केर्नी आणि पूंछ जिल्हा मुख्यालय या भागात गोळीबार झाला, ज्यामुळे डझनभर घरे आणि वाहनांचे नुकसान झाले. पुंछ बसस्थानकावरही हल्ला झाला. अनेक बसेसचे नुकसान झाले. सततच्या गोळीबारामुळे जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास अडचणी आल्या.
गुरुद्वाऱ्यावर थेट तोफेचा मारा; तीन शीख भाविकांचा मृत्यू
पुंछ शहरातील गुरुद्वाऱ्यावर आणि शेजारील घरांवर तोफगोळा टाकल्याने तीन शीख भाविक ठार झाले. मृतांमध्ये भजन गायक भाई अमरीक सिंग, भाई अमरजीत सिंग आणि भाई रणजीत सिंग यांचा समावेश होता. या घटनेचा पंजाबमधील अनेक पक्षांनी तीव्र निषेध केला असून, शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी याला "अमानवी हल्ला" ठरवले.
बारामुल्ला आणि कुपवाड्यातही हल्ला, ५ मुलांसह १३ जखमी
उरी (बारामुल्ला) येथे पाच लहान मुलांसह १० जण जखमी झाले. राजौरीत तीन जण जखमी झाले, तर कर्ना (कुपवाडा) भागात अनेक घरांना आग लागली.
रुग्णालय सज्ज, ९ सार्वजनिक छावण्या सुरू
जीएमसी राजौरीचे प्राचार्य डॉ. अमरजीत सिंग भाटिया यांनी सांगितले की, “आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत.” तर, पूंछ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या गावांमधून स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी पुरेशा सुविधांसह नऊ सार्वजनिक निवारा छावण्या उघडण्यात आल्या असून, बंकरमधून स्थलांतरितांना त्यात ठेवले जात आहे.
भारतीय सैन्याचे सडेतोड प्रत्युत्तर, अनेक पाक चौक्या उद्ध्वस्त
भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले असून, अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूला मोठी जीवितहानी झाल्याचेही समजते. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन्ही देशांमधील युद्धबंदी कराराचे नूतनीकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच इतका तीव्र गोळीबार सुरू आहे. भारत-पाक संघर्षामुळे सीमावर्ती भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.
मृतांची नावे:
बलविंदर कौर ऊर्फ रूबी (वय ३३), मोहम्मद झैन खान (१०), झोया खान (१२), मोहम्मद अक्रम (४०), अमरीक सिंग (५५), मोहम्मद इक्बाल (४५), रणजीत सिंग (४८), शकीला बी (४०), अमरजीत सिंग (४७), मरियम खातून (७), विहान भार्गव (१३), मोहम्मद रफी (४०) आणि एक लान्स नायक (सैनिक).