भारताची आफ्रिकेसोबत चार क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याची योजना

भारतीय उद्योग महासंघ CII-EXIM बँक परिषदेत भारत - आफ्रिका वृद्धीकारक भागीदारी या विषयावर संबोधन करत होते
भारताची आफ्रिकेसोबत चार क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याची योजना

दोन्ही देशांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारताची आफ्रिकेसोबत चार क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्याची योजना आहे. त्यापैकी सौर उर्जा हे पहिले क्षेत्र असून ते स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा यामध्ये साहाय्यभूत ठरेल आणि आफ्रिकेत रोजगार निर्मिती वाढीस लागेल. दुसरे क्षेत्र म्हणजे हिंद महासागरातील संरक्षण व्यापार, लष्करी देवाणघेवाण, सशस्त्र वाहने आणि UAV चे उत्पादन. तिसरे क्षेत्र आहे ते भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान / सल्ला आणि प्रकल्प निर्यात आणि चौथे म्हणजे आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल, भारतीय उद्योग महासंघ CII-EXIM बँक परिषदेत भारत - आफ्रिका वृद्धीकारक भागीदारी या विषयावर संबोधन करत होते. भारत आणि आफ्रिका या दोन राष्ट्रांमधील घनिष्ठ मैत्री वर्षानुवर्षे अधिक दृढ होत असून सामायिक इतिहास, व्यापार उदीम आणि चित्रपटांबद्दलचे प्रेम हे दोन्ही देशांमधले समान दुवे आहेत, असे त्यांनी सांगितले.

आपले सरकार आफ्रिकेबरोबरच्या या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देते, आफ्रिकेसोबतचे भारताचे संबंध विश्वास, मैत्री आणि एकमेकांच्या गरजा समजून घेण्याच्या सखोल जाणिवेवर आधारलेले आहेत, असे पीयूष गोयल म्हणाले.

भारत – आफ्रिका या दोन्ही राष्ट्रांमध्ये जगातील एक तृतीयांश लोकसंख्या एकवटलेली आहे, दोन्ही राष्ट्रात कित्येक क्षेत्रांमध्ये समन्वय आहे, त्यामुळे भारत-आफ्रिका भागीदारी आमच्या पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि आफ्रिकेतील नागरिकांच्या समृद्धीसह आपल्या सामायिक उज्ज्वल भविष्यासाठी, भारतीय उद्योग महासंघ, एक्झिम बँक आणि आफ्रिकन राष्ट्र यांच्यातील समन्वय मोठे परिवर्तन घडवून आणू शकेल, असे त्यांनी सांगितले.

ही परिषद अशावेळी आयोजित केली आहे, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आम्ही भारताच्या विकासासाठी नवीन उद्दिष्टे आणि एक नवीन दृष्टी निश्चित करत आहोत. २०४७मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होत असताना पुढील अत्यंत महत्त्वाची अशी २५ वर्षे जगाचा आर्थिक विकास, वृद्धी आणि समृद्धीला नेतृत्व देणारे राष्ट्र म्हणून भारताची नवीन ओळख निर्माण होईल, असे ते म्हणाले.

भारताला आफ्रिकेकडून नेहमीच मिळणाऱ्या पाठिंब्याचा त्यांनी उल्लेख केला. जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीत भारत आणि आफ्रिका विकसनशील जगाचा आवाज म्हणून एकत्र आले, हे त्याचेच प्रतीक आहे. भारत आणि आफ्रिकेने बहुपक्षीय व्यापार प्रणालीच्या समर्पकतेची जपणूक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in