संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या मणिपूरविषयक वक्तव्यावर भारताचा निषेध - वक्तव्य विनाकारण, दिशाभूल करणारे असल्याचे मत

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी यावर निषेध नोंदवला आहे
संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या मणिपूरविषयक वक्तव्यावर भारताचा निषेध - वक्तव्य विनाकारण, दिशाभूल करणारे असल्याचे मत

जिनिवा : संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) काही तज्ज्ञांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत केलेल्या वक्तव्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तज्ज्ञांचे हे वक्तव्य विनाकारण, कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारे असल्याचे मत भारताने व्यक्त केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या स्पेशल प्रोसिजर मँडेट होल्डर्स (एसपीएमएच) या समितीने इंडिया : यूएन एक्स्पर्ट्स अलार्म्ड बाय कंटिन्युईंग अब्युजेज इन मणिपूर अशा शीर्षकाचे एक पत्रक नुकतेच जारी केले होते. त्यात मणिपूरमध्ये मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, नागरिकांच्या घटनाबाह्य मार्गाने हत्या होत आहेत, घरे उद्ध्वस्त केली जात आहेत, लोकांना सक्तीने स्थलांतरास भाग पाडले जात आहे आणि सरकार या बाबींकडे पुरेसे लक्ष देत नाही, आदी आरोप केले होते.

त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी यावर निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी भारताची बाजू समजून न घेता ही विधाने केली असून ती अनाठायी, कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारी आहेत. भारत सरकार राज्यातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था आहे, असे भारताने म्हटले आहे. एसपीएमएचने यापुढे अधिक जबाबदारीने आणि तथ्यांवर आधारित विधाने करावीत, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in