नवी दिल्ली : बांगलादेशातील अल्पसंख्यांकांविरुद्ध ‘कायमचे शत्रुत्व’ हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय असल्याचे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर, बांगलादेशातील आगामी संसदीय निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक असायलाच हव्यात, असेही भारताने पुन्हा अधोरेखित केले.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांच्या मायदेशी परतण्यावरही भारताने सावध प्रतिक्रिया दिली आहे. ही बाब सर्वसमावेशक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या संदर्भात पाहिली जावी, असे भारताने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशातील हिंदू तरुण दिपू चंद्र दास याच्या नुकत्याच झालेल्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध या अल्पसंख्यांकांविरोधात बांगलादेशातील ‘शत्रुत्व’ ही गंभीर बाब आहे. बांगलादेशातील हिंदू युवकाच्या अलीकडील हत्येचा आम्ही निषेध करतो आणि या गुन्ह्यातील दोषींना न्यायासमोर आणले जाईल, अशी अपेक्षा आहे,” असे जयस्वाल यांनी साप्ताहिक संवादात सांगितले.
जयस्वाल म्हणाले की, ‘भारत हा बांगलादेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हंगामी सरकारच्या कार्यकाळात बांगलादेशात अल्पसंख्यांकांविरोधात २,९०० हून अधिक हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले.
बांगलादेशातील अल्पसंख्यांकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांकडे माध्यमांची अतिशयोक्ती म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्यांना केवळ राजकीय हिंसाचार म्हणून फेटाळून लावता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.