जागतिक भूक निर्देशांकात भारत १०७व्या स्थानावर

नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचे या निर्देशांकावरून स्पष्ट झाले आहे.
जागतिक भूक निर्देशांकात भारत १०७व्या स्थानावर

जागतिक भूक निर्देशांकात इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाली आहे. जागतिक भूक निर्देशांक (ग्लोबल हंगर इंडेक्स) यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला पाकिस्तान आणि भारताचा छोटा भाऊ मानला जाणारा नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचे या निर्देशांकावरून स्पष्ट झाले आहे.

२०२१मध्ये या यादीत भारत १०१व्या स्थानावर होता. हे स्थानही भारतातील भूकेसंदर्भातील गंभीर परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुरेसे होते; मात्र यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांनी घसरण झाली आहे. जगभरातील १२१ देशांमध्ये आता भारत १०७व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते. भारत या यादीत आता झाम्बिया, सिएरा लियोन, लायबेरिया, हैती, रिपब्लिक ऑफ कॉन्गो या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे.

‘कन्सर्न वर्ल्डवाइड’ आणि ‘वेल्थ हंगर लाइफ’ या संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. संबंधित देशामध्ये उपाशीपोटी राहणाऱ्या लोकांच्या आकडेवारीवरून भुकेची तीव्रता किती आहे, या निकषावर त्या-त्या देशांचे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार रँकिंग करण्यात येते. भारताला या निकषांवर २९.१ इतके रँकिंग मिळाल्यामुळे भारताची यादीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ९.९ पेक्षा कमी गुण असल्यास त्या देशातील परिस्थिती चांगली मानली जाते. हे रँकिंग १० ते १९.९ पर्यंत असल्यास परिस्थिती बरी मानली जाते. २० ते ३४.९ यादरम्यान रँकिंग असल्यास गंभीर, ३५ ते ४९.९ दरम्यान असल्यास चिंताजनक आणि ५०च्यावर रँकिंग असल्यास परिस्थिती भीषण असल्याचे मानले जाते.

येमेन शेवटच्या क्रमांकावर

या यादीमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजेच १२१व्या स्थानी येमेन हा देश आहे. तर सर्वात वर असणाऱ्या देशांमध्ये चीन आणि कुवेत या आशियायी देशांचा समावेश आहे. युरोप खंडातील देश यादीत वरच्या स्थानी आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in