
नवी दिल्ली : दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवड प्रक्रियेत चीन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केवळ स्थापित परंपरा आणि दलाई लामांच्या इच्छेनुसारच केली जाईल, यामध्ये इतर कोणालाही अधिकार नाही, असे भारताने चीनला सुनावले आहे.
सध्या दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण असणार, याची चर्चा सर्वत्र होत आहे. अवघ्या जगाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. सध्याचे दलाई लामा हे आता वयाची नव्वदी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आता त्यांचे अधिकार कुणाकडे जाणार याविषयी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पश्चात तिबेटी बौद्ध परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने उत्तराधिकारी हा अतिशय महत्त्वाचा असतो.
चीनचा तिबेटवर डोळा
त्यातच चीनचा डोळा तिबेटवर असल्याने, या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. मात्र, आता तिबेटियन दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीवरून भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दलाई लामांच्या उत्तराधिकारी निवडीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेलाच आहे, असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी ठणकावले आहे.