SCO च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने घेतला आक्षेप

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नसल्याने आणि बलुचिस्तानचा उल्लेख करून भारतावर अप्रत्यक्षपणे तेथे अशांतता निर्माण करण्याचा आरोप करण्यात आल्याने ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट नकार दिला आणि...
SCO च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने घेतला आक्षेप
Published on

क्विंगदाओ : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नसल्याने आणि बलुचिस्तानचा उल्लेख करून भारतावर अप्रत्यक्षपणे तेथे अशांतता निर्माण करण्याचा आरोप करण्यात आल्याने ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट नकार दिला आणि चीन व पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’चे अध्यक्षपद चीनकडे असल्याने हे निवेदन पाकिस्तानच्या आग्रहावरून तयार करण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चीनमध्ये झालेल्या या शिखर परिषदेत राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्व सदस्य देशांनी एकत्र यावे, कारण प्रादेशिक सुरक्षितता आणि शांततेसाठी दहशतवाद हे सर्वात मोठे आव्हान आहे. अतिरेकी विचारसरणी, दहशतवाद आणि विश्वासाचा अभाव हेच या समस्यांचे मूळ आहे, असेही ते म्हणाले. कोणताही देश, कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी एकटा कारवाई करू शकत नाही. यामुळे जागतिक व्यवस्थेत एकमेकांचा विश्वास आणि सहकार्य यावर भर दिला पाहिजे. शांतता, समृद्धी आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

दहशतवाद्यांना लक्ष्य करताना मागे हटणार नाही - राजनाथ

पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने दहशतवादाविरोधात स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क बजावला आहे आणि भविष्यातील अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. या हल्ल्याची पद्धत लष्करच्या पूर्वीच्या हल्ल्यांसारखीच होती. भारताने हे दाखवून दिले की, दहशतवादाची केंद्रबिंदू असलेली ठिकाणे आता सुरक्षित राहिलेली नाहीत आणि आम्ही अशा जागांना लक्ष्य करताना मागे हटणार नाही, असेही सिंह म्हणाले.

कारवाई सुरूच राहणार

या महत्त्वाच्या बैठकीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ देखील उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांदरम्यान दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. ‘एससीओ’ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पाकिस्तानी मंत्र्यांसमोर राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरुद्ध आमची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in