
नवी दिल्ली : फळ व भाज्यांच्या दरात घट झाल्याने मे महिन्यात किरकोळ महागाई दराने सहा वर्षांचा नीचांक नोंदवला असून मेमध्ये महागाईचा दर २.८२ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये महागाईचा दर ३.१६ टक्के व मे २०२४ मध्ये महागाईचा दर ४.८ टक्के होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने मे महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. मेमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ०.९९ टक्के आहे. गेल्यावर्षी ही महागाई ८.६९ टक्के होती.
मे २०२५ मध्ये खाद्यपदार्थांची महागाई ऑक्टोबर २०२१पेक्षा कमी आहे. मे २०२५ मध्ये मुख्य महागाई व अन्नपदार्थांची महागाई यांच्यात मोठी घट झाली. डाळ, भाजी, घरगुती सामान, सेवा, साखर, अंड्यांच्या दरात घट झाल्याने खाद्य महागाई कमी झाली.
रेपो दरात पुन्हा कपातीचे संकेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात भविष्यात कपात करण्याचे संकेत नुकत्याच झालेल्या पतधोरणात दिले होते. या पतधोरणात आरबीआयने रेपो दर ५.५ टक्के केला. फेब्रुवारी ते आतापर्यंत आरबीआयने रेपो दरात १ टक्के कपात केली. या कपातीनंतर रेपो दर गेल्या तीन वर्षांत सर्वात कमी स्तरावर आला आहे.