राजेंद्र पाटील/पुणे
देशातील वाढत्या उष्णतेच्या लाटेचा फटका आता केवळ दिवसाच नाही, तर रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. 'कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर' (सीइईडब्लू) या हवामान बदलावर अभ्यास करणाऱ्या संस्थेने देशातील ७३४ जिल्ह्यांचे सखोल विश्लेषण करून एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, गेल्या दशकात म्हणजेच २०१२ ते २०२२ या काळात भारतातील ७० टक्के जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यातील रात्री पूर्वीपेक्षा अधिक उष्ण झाल्याचे समोर आले आहे.
१९८१ ते २०११ या तीस वर्षांच्या कालखंडाच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत दर उन्हाळ्यात सरासरी पाच अतिरिक्त 'अतिउष्ण रात्री' नोंदवल्या गेल्या आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, हे मानवी आरोग्यासाठी एक 'सायलेंट' म्हणजेच छुप्या आरोग्य संकटाचे गंभीर लक्षण आहे.
या अभ्यासामध्ये ३५ विविध शास्त्रीय निर्देशकांचा वापर करून उष्णतेच्या जोखमीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यामध्ये असे दिसून आले की, देशातील ४१७ जिल्हे सध्या 'उच्च' आणि 'अतिउच्च' जोखीम श्रेणीत मोडतात. विशेष चिंतेची बाब म्हणजे, दिवसाच्या तापमानापेक्षा रात्रीचे तापमान अधिक वेगाने वाढत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, भोपाळ आणि भुवनेश्वर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये उष्णतेची ही झळ अधिक तीव्र झाली आहे.
७६ टक्के लोक या नैसर्गिक संकटाच्या छायेत
‘सीइईडब्लू’चे तज्ज्ञ डॉ. विश्वास चितळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ५७ टक्के जिल्ह्यांना आता या अतिउष्णतेचा थेट धोका निर्माण झाला असून, देशातील एकूण लोकसंख्येपैकी ७६ टक्के लोक या नैसर्गिक संकटाच्या छायेत वावरत आहेत. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, उत्तर भारतात विशेषतः इंडो-गॅंजेटिक मैदानी प्रदेशात हवेतील आर्द्रता १० टक्क्यांनी वाढली आहे, ज्यामुळे उष्णतेचा त्रास अधिकच असह्य आणि जीवघेणा होत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ
‘सीइईडब्लू’ संस्था सध्या १४० हून अधिक शहरांमध्ये असे आराखडे राबविण्यासाठी तांत्रिक मदत करत असून, २०२७ पर्यंत ही संख्या ३०० शहरांपर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत होणारी प्रचंड वाढ लक्षात घेता, भविष्यातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी २०३० पर्यंत ६०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
आरोग्यावर विपरीत परिणाम
रात्रीचे तापमान वाढल्यामुळे मानवी शरीराला दिवसाच्या उष्णतेतून सावरण्यासाठी आणि स्वतःला नैसर्गिकरीत्या थंड करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि पोषक वातावरण मिळत नाही. याचा थेट आणि विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान मुले, दिवसभर घराबाहेर शारीरिक कष्टाची कामे करणारे मजूर आणि आधीच उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारखे आजार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत घातक ठरू शकते.
'उष्णता कृती आराखडा' तयार करणे अनिवार्य
या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर स्थानिक पातळीवर 'उष्णता कृती आराखडा' तयार करणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे अनिवार्य झाले आहे. सध्या महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरात सारखी राज्ये हवामान आणि आरोग्यविषयक डेटा एकत्रित करून स्थानिक स्तरावर नियोजन करत आहेत.