

नवी दिल्ली : दहशतवाद, अतिरेकी कृत्ये, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी, मनी लाँड्रिंग, दहशतवादाला होणारा निधी पुरवठा आणि अवैध अमली पदार्थांची तस्करी यांचा मुकाबला करण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य बळकट करण्याचा निर्धार भारत आणि रशिया यांनी व्यक्त केला. युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रह धरला असता, त्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अनुकूलता दर्शवली.
भारत आणि रशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा, ज्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलवरील हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदविला आहे.
दोन नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांना आणि अभिव्यक्तींना, तसेच दहशतवाद्यांची सीमापार हालचाल, दहशतवादी वित्तपुरवठा नेटवर्क आणि सुरक्षित आश्रयस्थानांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी आपली तीव्र वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. त्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे आणि २२ मार्च २०२४ रोजी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध केला, असे संयुक्त निवेदनात नमूद केले आहे. दहशतवादाची सर्व कृत्ये गुन्हेगारी आणि असमर्थनीय आहेत. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच असल्याचे सांगतानाच, ही कृत्ये मग ती कोणत्याही धार्मिक किंवा वैचारिक सबबीखाली, कधीही, कुठेही आणि कोणाकडूनही केली गेली असली तरी खपवून घेतली जाता कामा नये यावर उभयतांनी एकमत दर्शविले.
आर्थिक, व्यापारी संबंधांना बळ देण्याची पंचवार्षिक योजना
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली भारत-रशिया शिखर परिषद शुक्रवारी सुफळ संपूर्ण झाली. अमेरिकेने भारतावर लादलेले वाढीव शुल्क आणि घातलेले अनेक निर्बंध या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दोन्ही देशांच्या आर्थिक आणि व्यापार संबंधांना बळकटी देण्यासाठी पाच वर्षांची योजना निश्चित केली, तर युक्रेनमधील युद्ध शांततेच्या मार्गाने संपुष्टात आणले पाहिजे, असे यावेळी मोदी यांनी पुतीन यांच्याकडे स्पष्ट केले.
मैत्री ध्रुवताऱ्यासारखी
जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेणाऱ्या शिखर बैठकीनंतर, मोदी आणि पुतीन यांनी आठ दशकांपेक्षा जुन्या भारत-रशिया मैत्रीला नवीन गती देण्याची तीव्र इच्छा दर्शवली. मोदी म्हणाले की, भू-राजकीय उलथापालथ असूनही ही मैत्री ‘ध्रुव ताऱ्या’सारखी स्थिर राहिली आहे. २०३० पर्यंतचा आर्थिक कार्यक्रम अंतिम करण्याव्यतिरिक्त, दोन्ही बाजूंनी आरोग्य, गतिशीलता आणि स्थलांतर, अन्न सुरक्षा, जलवाहतूक आणि लोकांमधील देवाणघेवाण यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.