नवी दिल्ली: गेल्या ७०-८० वर्षांमध्ये भारत आणि रशियाची भागीदारी ही जागतिक स्तरावरील सर्वात स्थिर मोठ्या संबंधांपैकी एक राहिली असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी केले. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नवी दिल्ली दौरा हा आर्थिक संबंधांवर लक्ष केंद्रित करून या संबंधांना 'पुनर्स्थापित' करण्याबद्दल होता, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी म्हटले आहे.
एका संवादात्मक सत्रात जयशंकर यांनी, पुतिन यांच्या भेटीमुळे अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार करारावरील भारताच्या वाटाघाटी गुंतागुंतीच्या होतील, मताशी त्यांनी असहमती दर्शवली.
जयशंकर यांनी एका चर्चासत्रात पुढे स्पष्ट केले की, भारताचे जगातील सर्व प्रमुख देशांशी संबंध आहेत हे सर्वांना माहीत आहे. आम्ही इतरांसोबत आमचे संबंध कसे विकसित करावेत यावर कोणत्याही देशाला 'नकाराधिकार' किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार असेल, अशी अपेक्षा करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
पुतिन यांच्या दोन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्याने भारत-रशिया संबंधांच्या आर्थिक पैलूला लक्षणीयरीत्या चालना दिली, याचा अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित व्यापार कराराच्या वाटाघाटींवर परिणाम होईल का, असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला होता.
ते म्हणाले, कारण लक्षात ठेवा, इतरांनाही तीच अपेक्षा असू शकते. आम्ही नेहमीच हे स्पष्ट केले आहे की आमचे अनेक देशांशी संबंध आहेत. आम्हाला निवडीचे स्वातंत्र्य आहे. आम्ही ज्याला धोरणात्मक स्वायत्तता म्हणतो, त्याबद्दल बोलतो आणि ते कायम राहील आणि याउलट कोणाला अपेक्षा का असावी, हे माझ्या कल्पनेपलीकडचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
जयशंकर यांनी कबूल केले की ट्रम्प प्रशासनाने व्यापारावर लक्ष केंद्रित केले आहे आणि या परिस्थितीला सामोरे जाण्याचा भारताचा दृष्टिकोन पूर्णपणे राष्ट्रीय हिताने प्रेरित आहे.
प्रमुख मुद्देः
भारत-रशिया संबंध: गेल्या ७०-८० वर्षांमध्ये हा संबंध सर्वात स्थिर मोठ्या
संबंधांपैकी एक आहे. पुतीन यांचा दौरा या संबंधांना आर्थिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून 'पुनर्स्थापित' करण्याबद्दल होता.
व्यापार वाटाघाटी : रशियासोबतचे संबंध अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर परिणाम करणार नाहीत, कारण भारताचे सर्व प्रमुख देशांशी संबंध आहेत आणि भारताला 'धोरणात्मक स्वायत्तता' राखण्याचे स्वातंत्र्य आहे.
राष्ट्रीय हितः कोणत्याही राजनैतिक संबंधात आपले राष्ट्रीय हित जपण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. कामगार, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांचे हित जपूनच अमेरिकेसारख्या देशासोबतचा व्यापार करार केला जाईल.
पुतीन भेटीचे महत्त्वाचे फलितः भारतीयांना रशियात अधिक सहजतेने कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी झालेला 'मोबिलिटी करार' आणि खतांवर संयुक्त प्रकल्प स्थापन करण्यावर झालेली सहमती.
भारत-चीन संबंध: सीमेवर शांतता आणि सलोखा असणे हे चांगल्या संबंधांसाठी पूर्वअट आहे. व्यापार, गुंतवणूक, स्पर्धा आणि पारदर्शकता यांसारख्या इतर मुद्द्यांवरही काम सुरू आहे.
पाकिस्तानः भारताच्या अनेक समस्यांचे मूळ पाकिस्तानच्या सैन्यामध्ये आहे. भारत आणि पाकिस्तान यांना एकत्र जोडू नये.