

मॉस्को: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन त्यांच्या प्रमुख प्रतिनिधींशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर भारत आणि रशियाने व्यापार, ऊर्जा आणि खतांच्या पुरवठ्यातील आपले सहकार्य आणखी वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आलेले जयशंकर यांनी रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांच्यासोबत ‘व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोग’च्या बैठकीचे सह-अध्यक्षपदही भूषवले.
१२-१३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी पुतिन यांच्या नवी दिल्ली दौऱ्यापूर्वी या बैठका होत आहेत. भारत आणि रशिया आपले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश आणि वैयक्तिक पत्र रशियन अध्यक्षांना सुपूर्द केले.
‘पंतप्रधान मोदी एससीओ शिखर परिषदेत आपल्याला भेटण्यासाठी, त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात आपले स्वागत करण्यासाठी आणि परस्पर सुविधेनुसार वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यासाठी उत्सुक आहेत, असे जयशंकर म्हणाले. त्यामुळे आपल्या सहकार्याचे चित्र अत्यंत मजबूत आहे असे मला वाटते. आपले आर्थिक सहकार्य, व्यापार, ऊर्जा, खते, अणुऊर्जा आणि इतर क्षेत्रांतील सहकार्य खूप मोठे आहे—मला याबद्दल सविस्तर बोलताना आनंद होत आहे. एकंदरीत, आपले आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे," असे सांगत जयशंकर यांनी आज झालेल्या बैठकीत आर्थिक सहकार्याचा एक 'चांगला अहवाल' सादर झाल्याचे नमूद केले.
रशियाच्या ‘तास’ (TASS) या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी जयशंकर यांना सांगितले की रशिया भारताला खतांचा पुरवठा वाढवत आहे आणि तो असाच सुरू ठेवण्यास तयार आहे.
१०० अब्ज डॉलर व्यापाराचे उद्दिष्ट
परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले की, बाजारपेठेत प्रवेश, टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे दूर करणे, पेमेंट यंत्रणा मजबूत करणे आणि व्यावसायिक संबंध दृढ करणे हे व्यापार असमतोल दूर करण्यासाठी आणि २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापाराचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.