भारताने कापूस उत्पादनात जागतिक सर्वोत्तम मानांकन मिळवावी - पियूष गोयल

सूती कापड मूल्य साखळीचा भाग असलेल्या हितधारकांची नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे बैठक झाली
भारताने कापूस उत्पादनात जागतिक सर्वोत्तम मानांकन मिळवावी - पियूष गोयल

भारताने कापूस उत्पादकतेत जागतिक सर्वोत्तम मानकांचा अंगीकार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कापूस उत्पादकतेला चालना देण्याची गरज असून त्यासाठी सर्व संबधित हितधारकांनी उत्तम पद्धतींची परस्परांमध्ये देवाणघेवाण केली पाहिजे. उत्पादकतेतील संशोधन, शेतकऱ्यांना शिक्षण आणि ब्रँडिग यासाठी खाजगी क्षेत्राने योगदान दिले पाहिजे. त्यासाठी सरकार पूरक साह्य करेलच असे मत पियूष गोयल यांनी व्यक्त केले. तसेच कापूस उत्पादकतेत वाढ रोजगार वाढीसाठी महत्त्वाची आहे, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे.

सूती कापड मूल्य साखळीचा भाग असलेल्या हितधारकांची नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे बैठक झाली. कापूस उत्पादकता वाढविणे आणि भारतीय कापसाचे ब्रँडिंग यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय वाणिज्य, उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक तसेच वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

एकात्मिक दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला. कापूस मूल्य साखळी अधिक मजबूत करण्यासाठी खाजगी क्षेत्राने मिशन मोडवर काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे तयार झालेल्या चांगल्या प्रतीच्या आपल्या कापसाला आपणच उद्योगांच्या समान योगदानाद्वारे प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांनी पुढे नमूद केले. कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील सेतूप्रमाणे कापूस काम करतो. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसावर आधारित उत्पादनांचा एकूण वस्त्रोद्योग आणि परिधान उत्पादनांमध्ये लक्षणीय वाटा आहे. मुक्त व्यापार कराराद्वारे बाजारपेठेत शिरकाव करता आल्यामुळे, उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्ही वाढविण्यासाठी एकत्रित कृती अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक कापूस उद्योगात आपले वर्चस्व परत आणण्याची गरज आहे आणि "आत्मनिर्भर भारत" निर्माण करण्यासाठी भारतीय वस्त्रोद्योग हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, असे गोयल यांनी सांगितले. केंद्र सरकार माननीय पंतप्रधानांच्या 'फार्म टू फायबर; फायबर ते कारखाना; फॅक्टरी ते फॅशन; फॅशन टू फॉरेन या 5F व्हिजनवर काम करत आहे, असे गोयल म्हणाले. योग्य बियाण्यांबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगतीशील कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन उत्पादन आणि नफ्याचे प्रमाण वाढवणे अत्यावश्यक आहे, असे गोयल पुढे म्हणाले. देशातील रोजगार वाढीसाठी कापूस उत्पादन आणि उत्पादकता वाढणे आवश्यक आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरणे आखण्याची गरज आहे, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in