
नवी दिल्ली : भारत आपले राष्ट्रहित जपण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे स्पष्ट करतानाच अमेरिका कशाप्रकारे रशियाशी व्यापार करते याचे दाखले देत भारताने अमेरिकेला खडे बोल सुनावले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरुन भारतावर पुन्हा एकदा मोठा दंड लावण्याचा उल्लेख सोमवारी केल्यानंतर भारताने आता 'पुरे झाले' म्हणत थेट नाव घेऊन अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये एकूण सहा मुद्दे मांडण्यात आले असून यामधून अमेरिकेबरोबरच युरोपियन महासंघालाही सुनावण्यात आले आहे. भारत आयात करत असलेले तेल हे भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध करुन देण्यासाठी किंमत सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केले जाते. मात्र, भारत हे अधोरेखित करु इच्छितो की, भारतावर टीका करणारे देश स्वतः रशियाशी व्यापारी संबंधांमध्ये आहेत.