
नवी दिल्ली : भारतातील ‘सामाजिक सुरक्षा कवच’ २०१५ साली असलेल्या १९ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ६४.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) आकडेवारीत जाहीर करण्यात आले आहे. सध्या सुमारे ९४ कोटी नागरिकांना ‘सामाजिक संरक्षणा’चा लाभ मिळतो आणि या लाभार्थी संख्येच्या आधारे भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
"ही वाढ जगभरातील ‘सामाजिक संरक्षण कव्हरेज’मधील सर्वाधिक वेगाने झालेली वाढ आहे. भारताला ही झेप ‘अंत्योदय’ योजनेमुळे शक्य झाली आहे. शेवटच्या व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी आणि कोणालाही मागे न ठेवण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचे हे फळ आहे," असे केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. ते जिनेव्हामध्ये ‘आयएलओ’च्या ११३व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत सहभागी झाले होते.
‘आयएलओ’ने भारताच्या या प्रगतीची दखल घेतली असून आपल्या डॅशबोर्डवर ६४.३ टक्के भारतीय लोकसंख्येला म्हणजेच ९४ कोटींपेक्षा अधिक लोकांना ‘किमान एक सामाजिक संरक्षण’ लाभ मिळत असल्याची नोंद केली आहे. गेल्या एका दशकात ४५ टक्क्यांनी झालेली ही वाढ अभूतपूर्व असल्याचे ‘आयएलओ’ने म्हटले आहे.
सामाजिक सुरक्षा कव्हरेजचे २०२५ चे आकडे आयएलओच्या ‘आयएलओस्टॅट’ डेटाबेसमध्ये अद्ययावत करणारा भारत हा पहिला देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गरीब आणि श्रमिक वर्गासाठी भारताने राबवलेल्या कल्याणकारी धोरणांचे ‘आयएलओ’चे महासंचालक गिल्बर्ट एफ. हॉउंगबो यांनी कौतुक केले आहे.