स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणेची चाचणी यशस्वी

भारताने ओदिशा किनाऱ्याजवळ एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्ल्यूएस) पहिली उड्डाण चाचणी ‘यशस्वी’ केली व बदलत्या प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीत आपली वाढती लष्करी क्षमता सिद्ध केली.
स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणेची चाचणी यशस्वी
Photo : X (@rajnathsingh)
Published on

नवी दिल्ली : भारताने ओदिशा किनाऱ्याजवळ एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्ल्यूएस) पहिली उड्डाण चाचणी ‘यशस्वी’ केली व बदलत्या प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीत आपली वाढती लष्करी क्षमता सिद्ध केली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आयएडीडब्ल्यूएस’ ही बहुद्देशीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. त्यात स्वदेशी तत्काळ प्रतिक्रिया देणारे भूपृष्ठावरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र, अल्प पल्ला असलेले हवाई संरक्षण क्षेपणास्त्र, उच्च क्षमतेच्या लेसर-आधारित थेट ऊर्जा शस्त्र (डीईडब्ल्यू) प्रणाली आदींचा समावेश आहे.

शनिवारी दुपारी १२.३० वाजता ओदिशा किनाऱ्याजवळ स्वदेशी हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही प्रणाली विकसित करणाऱ्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटने’चे (डीआरडीओ) तसेच सशस्त्र दलांचे उड्डाण चाचणीबद्दल अभिनंदन केले.

नवीन हवाई संरक्षण प्रणालीची ही चाचणी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर साडेतीन महिन्यांनी पार पडली. या चाचणीमुळे आपल्या देशाची बहुद्देशीय हवाई संरक्षण क्षमता स्थापित झाली आहे. शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वाच्या सुविधांच्या क्षेत्रीय सुरक्षेला यामुळे बळकटी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

‘आयएडीडब्ल्यूएस’अंतर्गत सर्व शस्त्र प्रणालींचे एकात्मिक संचालन ‘केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटर’द्वारे केले जाणार आहे. हे केंद्र ‘डीआरडीओ’ने विकसित केले असून, तीच हवाई संरक्षण कार्यक्रमाची मुख्य प्रयोगशाळा आहे.

उड्डाण चाचणीच्यावेळी तीन वेगवेगळे लक्ष्य-दोन उच्च वेगाचे फिक्स्ड-विंग मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) आणि एक मल्टीकॉप्टर ड्रोन यांना क्षेपणास्त्रांनी आणि उच्च ऊर्जा लेसर शस्त्र प्रणालीने वेगवेगळ्या उंची व अंतरावर लक्ष्य करून पूर्णपणे नष्ट केले, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

यात सर्व शस्त्र प्रणाली घटक, मिसाईल प्रणाली, ड्रोन शोध व नाश प्रणाली, कमांड अँड कंट्रोल यंत्रणा, संवाद साधने आणि रडार्स यांनी अचूक कामगिरी केली, असे नमूद करण्यात आले.

चांदीपूर येथील ‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज’ने या प्रणालीच्या कामगिरीला दुजोरा दिला. या चाचणीला ‘डीआरडीओ’तील ज्येष्ठ वैज्ञानिक तसेच सशस्त्र दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in