

नवी दिल्ली : ओमानच्या किनारपट्टीवर भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या व्यावसायिक जहाजांवर अमेरिकन सैन्याने केलेले प्राणघातक हल्ले हे ‘अस्वीकारार्ह’ असल्याचे स्पष्ट करीत भारताने शुक्रवारी अमेरिकेचे प्रभारी राजदूत (चार्ज डी अफेअर्स) जेसन मीक्स यांना पुन्हा समन्स बजावले आणि तीव्र आक्षेप नोंदवला.
अमेरिकेच्या या कारवाईत एका टँकरवरील तीन भारतीय क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याचे सरकारने स्पष्ट केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते. यापूर्वी बुधवारी रात्रीही मीक्स यांना समन्स बजावण्यात आले होते.
हल्ल्यांबद्दल नोंदविला तीव्र निषेध
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ओमानच्या आखातात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर अमेरिकन नौदलाने सुरू ठेवलेल्या हल्ल्यांबद्दल त्यांच्याकडे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे आधीच तीन निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे, जो अत्यंत क्लेशदायक आणि टाळता येण्याजोगा होता.