भारताची जागतिक दूरसंचार उत्पादन केंद्र होण्याकडे वाटचाल - मोदी; BSNL च्या 'स्वदेशी' ४जीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

भारत संचार निगम लि.च्या (बीएसएनएल) रौप्य महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी येथे बीएसएनएलच्या स्वदेशी ४जी प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे दूरसंचार पायाभूत सुविधा क्षेत्राला अधिक चालना मिळणार असून भारत दूरसंचार उपकरणे तयार करणाऱ्या देशांच्या पंक्तीत प्रवेश करणार आहे.
भारताची जागतिक दूरसंचार उत्पादन केंद्र होण्याकडे वाटचाल - मोदी; BSNL च्या 'स्वदेशी' ४जीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
Photo : X (@TheDailyPioneer)
Published on

झारसुगुदा : भारत संचार निगम लि.च्या (बीएसएनएल) रौप्य महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी येथे बीएसएनएलच्या स्वदेशी ४जी प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे दूरसंचार पायाभूत सुविधा क्षेत्राला अधिक चालना मिळणार असून भारत दूरसंचार उपकरणे तयार करणाऱ्या देशांच्या पंक्तीत प्रवेश करणार आहे.

मोदी यांच्या हस्ते यावेळी ९७ हजार ५०० हून अधिक मोबाईल ४जी मनोरे कार्यान्वित करण्यात आले असून त्यामध्ये ९२ हजार ६०० ४जी तंत्रज्ञान स्थळांचा समावेश आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या मनोऱ्यांसाठी ३७ हजार कोटी रुपये खर्च आला आहे.

दूरसंचार उत्पादन केंद्र

बीएसएनएलची स्तुती करताना मोदी यांनी, आता भारत दूरसंचार उपकरणे तयार करणाऱ्या डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत प्रवेश करणार आहे, असे सांगितले. जागतिक स्तरावर जेव्हा २जी, ३जी आणि ४जी सेवा सुरू करण्यात आल्या तेव्हा भारत या सेवांसाठी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून होता, मात्र आता भारत जागतिक दूरसंचार उत्पादनाचे केंद्र होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या ४ जी प्रणालीच्या विस्ताराचा देशातील दोन कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे, जवळपास ३० हजार गावे आता या पुढाकारामुळे जोडली जाणार आहेत. या सेवेचा आदिवासी प्रदेश, दुर्गम गावे आणि डोंगराळ प्रदेशांनाही लाभ होणार आहे, असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने देशातील जनतेची लूट केल्याचा आरोप मोदी यांनी केला. अत्यल्प उत्पन्न गटातील वर्गावरही काँग्रेसने कर लादला, असेही मोदी म्हणाले. जनतेची लूट करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांनी वार्षिक दोन लाख रुपये उत्पन्न असलेल्या वर्गावर कर लादला, मात्र भाजपने ही मर्यादा १२ लाखांच्या वर नेली, असेही पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in