

नवी दिल्ली : पुढील दशकात भारतातील घरांमध्ये अतिरिक्त २० कोटी एअर कंडिशनर बसवले जाणार असून, त्यामुळे भारत जागतिक ऊर्जा मागणी वाढीचा सर्वात मोठा चालक ठरेल, असे ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी’ने ‘वर्ल्ड एनर्जी आऊटलुक २०२६’ अहवालात म्हटले आहे.
भारत आणि आग्नेय आशियाचा जागतिक एअर कंडिशनर साठ्यामधील हिस्सा आजच्या ‘१० टक्क्यांपेक्षा कमी’ पातळीवरून २०३५ पर्यंत ‘२० टक्क्यांपर्यंत’ वाढेल, असे एजन्सीने नमूद केले आहे. उष्णतेची मोठी गरज असूनही भारत आणि इंडोनेशियामध्ये ‘पाचपैकी एकापेक्षा कमी कुटुंबांकडे’ एअर कंडिशनर असल्याचे अहवालात म्हटले आहे.
याउलट, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेतील ९० टक्के घरांमध्ये किमान एक एअर कंडिशनर आहे. ‘ऊर्जेच्या इतिहासात पहिल्यांदाच’ इमारतींमधील शीतकरणाची मागणी तापन मागणीपेक्षा पुढे जात असल्याचे ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी’ने स्पष्ट केले आहे.
‘स्टेटेड पॉलिसीज सिनारिओ’नुसार पुढील दशकात भारताची वीज मागणी वार्षिक ६ टक्के दराने वाढण्याची शक्यता असून, हा कोणत्याही प्रमुख प्रदेशातील सर्वाधिक वेग आहे.
एकूण ऊर्जा मागणी वार्षिक २.५ टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून, तो ‘जागतिक दराच्या तिप्पट’ आहे. जागतिक स्तरावर २०३५ पर्यंत शीतकरणाची मागणी १,७०० टेरावाॅट-तासांनी वाढण्याची शक्यता असून, ही वाढ ‘सध्याच्या भारताच्या वीज मागणीइतकीच’ असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.