
वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी दावा केला की, काही वर्षांत भारत जागतिक स्तरावर पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये असेल. २०४७ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला २०४७ चा रोडमॅप दाखवला आहे, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची १००वर्षे साजरी करेल. आपला देश जगातील पहिल्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये असेल.
वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले की, २०२१ च्या तुलनेत या कालावधीत निर्यात १७ टक्के वाढली आहे. अशा परिस्थितीत निर्यात वाढवणे ही चांगली बाब आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे आम्हाला वर्षाच्या अखेरीस ४५०-४७० अब्ज डॉलर्सपर्यंत निर्यात करता येईल. २०२१च्या तुलनेत ४०-५० अब्ज डॉलर्स निर्यातीत वाढ झाली. ते म्हणाले की सेवांच्या बाबतीत, आम्ही ९५ अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्के अधिक आहे. दर महिन्याला आम्ही सुमारे २५ अब्ज डॉलर्स किमतीच्या सेवा निर्यात करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही वर्षाच्या अखेरीस ३०० अब्ज डॉलर्सची निर्यात करू शकू.
जीडीपीची वाढ दुहेरी अंकात अपेक्षित
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ दोन अंकी राहण्याची पेक्षा व्यक्त केली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले. जीडीपी वाढीबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. यादरम्यान त्यांनी त्या बातमीचाही संदर्भ दिला ज्यामध्ये देशात मंदीचा धोका नसल्याचे म्हटले होते.