
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत ठरणारी २६ राफेल सागरी लढाऊ विमाने फ्रान्सकडून खरेदी करण्यास भारताने मान्यता दिली आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात याबाबत ६३ हजार कोटी रुपयांचा करार लवकरच होणार आहे.
या करारांतर्गत, भारतीय नौदलाला फ्रान्सकडून २२ सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर विमाने मिळणार आहेत. सरकारी सूत्रांचा हवाल्याने एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ३७ ते ६५ महिन्यांत डसॉल्ट एव्हिएशनकडून बनवण्यात येणारी २६ राफेल-एम विमाने भारताला मिळण्याची अपेक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने प्रामुख्याने स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात केली जातील. यामुळे भारताला हिंद महासागर क्षेत्रातील चिनी हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल.
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
या करारानुसार, नौदलाला २६ राफेल विमानांसह देशातील काही भागांत प्रशिक्षण, देखभाल, लॉजिस्टिक्स सपोर्ट आणि उत्पादनाचे मोठे पॅकेजही मिळणार आहे. याचा अर्थ केवळ विमानेच नाही तर त्यांना उडवण्याची आणि हाताळण्यासाठीही फ्रान्सकडून सहकार्य करण्यात येणार आहे. या करारात केवळ विमानांचाच समावेश नाही तर भारतीय हवाई दलासाठी ग्राउंड बेस्ड सॉफ्टवेअर आणि सिस्टम अपग्रेडचाही समावेश आहे. ‘राफेल मरीन’ चालवण्यासाठी नौदलाला ‘आयएनएस विक्रांत’वर काही विशेष उपकरणे बसवावी लागतील ज्यामुळे त्यांच्या कामगिरीत कोणतीही तडजोड होणार नाही.
इतर जेट्समध्ये इंधन भरण्याची क्षमता
नवीन राफेल सागरी लढाऊ विमान खरेदी करारामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढेल, कारण त्यामुळे त्यांची आकाशातच इंधन भरण्याची प्रणाली सुधारेल. यामुळे सुमारे १० आयएएफ राफेल जेट्स उड्डाणादरम्यान इतर जेट्समध्ये इंधन भरू शकतात, ज्यामुळे ते लँडिंगशिवाय लांब प्रवास करू शकतील.
विशिष्ट उपकरणे
संरक्षण दलातील सूत्रांनी पूर्वी सांगितले होते की, नवीन करारात ‘आयएएफ’च्या ताफ्यासाठी जमिनीवरील उपकरणे आणि सॉफ्टवेअर अपग्रेडचाही समावेश असू शकतो. याव्यतिरिक्त, ४.५ जनरेशनच्या राफेल विमानांच्या ऑपरेशनला सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाला त्यांच्या विमानवाहू जहाजांवर काही विशिष्ट उपकरणे बसवावी लागतील. याशिवाय, नौदल डीआरडीओद्वारे तयार करण्यात येत असलेल्या स्वदेशी पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा समावेश करण्याची योजना आखत आहे.