

नवी दिल्ली : अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमधून सूट मिळण्यावर कोणताही निर्णय झाला नसला, तरी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवणार आहे. ऊर्जा सुरक्षेची गरज स्पष्ट करताना भारताने ही भूमिका घेतली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ब्लूमबर्गच्या एका वृत्तात भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडे निर्बंधांमधून सूट मागितल्याचा दावा करण्यात आला होता, त्या पार्श्वभूमीवर भारताने हे स्पष्टीकरण दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुजाता शर्मा म्हणाल्या की, अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्यापूर्वी, निर्बंधांच्या काळात आणि आताही भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि पुढेही करत राहील. भारताची तेल खरेदी ही प्रामुख्याने व्यावसायिक अटी आणि आर्थिक फायद्यावर आधारित आहे. देशात सध्या कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा उपलब्ध असून तेलाचा कोणताही तुटवडा भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.