6जी मध्ये भारत जगाचे नेतृत्व करील; 5G लॉन्चनंतर आयटी मंत्र्यांचे वक्तव्य

आयटी मंत्र्यांचे हे वक्तव्य देशात 5जी सेवा सुरू झाल्यानंतर एका दिवसानंतर आले आहे.
6जी मध्ये भारत जगाचे नेतृत्व करील; 5G लॉन्चनंतर आयटी मंत्र्यांचे वक्तव्य
Published on

भारताने 6G कनेक्टिव्हिटीमध्ये जगाचे नेतृत्व करावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी केले.

आयटी मंत्र्यांचे हे वक्तव्य देशात 5जी सेवा सुरू झाल्यानंतर एका दिवसानंतर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G सेवा सुरू केली. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि अहमदाबाद सारख्या १३ शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली आहे.

5G च्या किमती कमी होतील

5G सेवा सुरू केल्यानंतर वैष्णव म्हणाले की, येत्या ६ महिन्यांत २००हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल आणि येत्या दोन वर्षांत देशातील ८०-९० टक्के भागात ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते म्हणाले की, बीएसएनएल पुढील वर्षी १५ ऑगस्टपासून 5G सेवा प्रदान करण्यास सुरुवात करेल. यासोबतच 5Gच्या किमतीही कमी होतील, जेणेकरून सर्वसामान्यांनाही त्याचा वापर करता येईल.

आयटी मंत्री म्हणाले की, येत्या काही वर्षांत जवळपास संपूर्ण देश 5G सेवेशी जोडला जाईल. २०३५पर्यंत, 5Gने भारताच्या अर्थव्यवस्थेत ४५० अब्ज डॉलर्स (सुमारे ३ हजार ६,७३ कोटी रुपये) योगदान देण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G सेवा देशाला सादर केली. पंतप्रधान मोदींनी इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत 5G लाँच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कार्यक्रमात सांगितले होते की, पुढील दशकात देशात 6G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

मोदी म्हणाले होते, स्वावलंबन आणि निरोगी स्पर्धा समाज आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात कसे बहुआयामी प्रभाव निर्माण करतात. आमचे दूरसंचार क्षेत्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

भारतात रविवारपासून 5G सेवा कार्यान्वित

भारतात अखेर रविवारपासून 5G सेवा कार्यान्वित झाली आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या माध्यमातून काही शहरांमध्ये 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. 2G, 3G आणि 4G नंतर, 5G ही मोबाइल नेटवर्कची पाचवी पिढी आहे. 4G नेटवर्क अजून बंद होणार नाही. बीएसएनएल सारख्या काही सेवा प्रदात्या अजूनही त्यांच्या वापरकर्त्यांना 3G सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे देशातील काही भागात 4G नेटवर्कही कायम राहणार आहे. 5G नेटवर्कचा लाभ संपूर्ण ग्राहक लाभ घेत नाहीत, तोपर्यंत 4G ही सेवा सुरूच राहणार आहे. जिओच्या वतीने सांगण्यात आले की, डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात ते 5G सेवा वितरित करण्याची योजना आखली आहे.

5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला नवीन सिम खरेदी करण्याची गरज नाही. 5G स्मार्टफोनच्या कार्ड स्लॉटमध्ये सिम टाकून, तुम्ही 5G सेवा वापरण्यास सक्षम असाल. जर तुमच्याकडे 3G किंवा 4G मोबाइल नसेल तर तुम्ही 5G सेवा वापरू शकणार नाही. 4G इंटरनेट सेवेच्या तुलनेत 5G सेवा वापरल्यास तुमचा मोबाइल लवकर डिस्चार्ज होईल. कारण फाईव्ह-जीचा स्पीड हा फोरजीपेक्षा जास्त असणार आहे. जिओ, एअरटेल किंवा कॅबिनेट मंत्रालयाकडून 5G रिचार्ज प्लॅनबाबत आतापर्यंत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, 5G प्लॅनची ​​किंमत 4G प्लॅन सारखीच असेल. तथापि, प्रीमियम वापरकर्त्यांसाठी काही दिवसांसाठी योजना महाग असू शकते.

वायरलेस इंडस्ट्री ट्रेड ग्रुपच्या (GSMA) म्हणण्यानुसार, 5जी नेटवर्कची इंटरनेटची स्पीड ही 4जीच्या स्पीडपेक्षा दहापट अधिक आहे. म्हणजे 4जीची इंटरनेट स्पीड १०० मेगाबाईट प्रति सेकंद आहे. तर 5जीची इंटरनेट स्पीड ही प्रति सेकंद १० गीगाबाईट (GBPS) असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in