भारताला उर्वरित S-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा २०२६मध्ये मिळणार; रशियाने दिली माहिती

भारताला उर्वरित ‘एस-४००’ क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा २०२६ मध्ये देण्यात येईल, अशी माहिती भारतातील रशियाचे उपायुक्त रोमन बाबुश्कीन यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : भारताला उर्वरित ‘एस-४००’ क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा २०२६ मध्ये देण्यात येईल, अशी माहिती भारतातील रशियाचे उपायुक्त रोमन बाबुश्कीन यांनी दिली.

भारत-पाकिस्तान संघर्षात ‘एस-४००’ने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. हवाई संरक्षण आणि ड्रोनविरोधी यंत्रणेसाठी भारतासोबत अधिक द्विपक्षीय सहकार्य करण्यात येईल, असे संकेत बाबुश्कीन यांनी दिले.

ते म्हणाले की, भारत-पाकिस्तान संघर्षात ‘एस-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने चांगली कामगिरी बजावल्याचे आम्ही ऐकले आहे. भारत आणि रशियात अनेक वर्षांपासून सहकार्य सुरू आहे. दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार भारताला आणखी दोन ‘एस-४००’ यंत्रणा द्यायच्या आहेत. ही यंत्रणा २०२५-२६ मध्ये भारताला देण्यात येईल. त्याची सावर्जनिक घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

भारताने २०१८ मध्ये रशियासोबत ५.४३ अब्ज डॉलरचा करार केला होता. या व्यवहारात भारताने रशियाकडून ५ ‘एस-४००’ यंत्रणा खरेदी केली. ही हवाई यंत्रणा अत्यंत आधुनिक असून विविध विमान, क्षेपणास्त्रांचा हल्ला परतवण्यास सक्षम आहे. भारताला आतापर्यंत तीन ‘एस-४००’ यंत्रणा मिळाल्या आहेत, तर दोन बाकी आहेत.

सध्या ड्रोन हल्ले वाढले आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात दिसला. रशियालाही ड्रोन हल्ल्याचा अनुभव येत आहे. आम्ही आमची यंत्रणा सातत्याने सुधारत आहोत. भारत आणि रशियाला ड्रोनचा धोका वाटत आहे. त्यामुळे याबाबत सहकार्य होऊ शकते. ड्रोनविरोधी यंत्रणा ही भारत-रशिया संरक्षण संवादाचा भाग होती.

रशियाचे परराष्ट्र मंत्री लवकरच भारत दौऱ्यावर

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरॉव हे लवकरच भारताला भेट देण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या भेटीची तारीख निश्चित झालेली नाही. ते जूनमध्ये येणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in