येत्या २०३५ पर्यंत भारत स्वत:चे अंतराळ केंद्र उभारेल. तसेच अंतराळात मोठमोठाले उपग्रह सोडण्यासाठी पुनर्वापर करता येणारी रॉकेटस् विकसित केली जातील, अशी घोषणा भारतीय अंतराळ विकास संशोधन संस्थेने (इस्त्रो) रविवारी केली.
इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, इस्त्रो रॉकेट डिझाईनवर खासगी कंपन्यांसोबत काम करत आहे. यामुळे आम्हाला त्यात निधी गुंतवावा लागणार नाही. सर्वांसाठी उद्योगांनी रॉकेट बनवण्यासाठी निधी गुंतवावा. हे रॉकेट १० ते २० टन उपग्रह नेऊ शकेल. या नवीन रॉकेटमुळे भारताला २०३५ पर्यंत स्वत:चे अंतराळ केंद्र उभारण्यास मदत मिळू शकेल. तसेच अंतराळात दूरवर मोहीम, अंतराळात मानवी मोहीमा, सामानवाहू मोहीम, बहुउद्देशीय कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या मोहीमा हाती घेतल्या जाणार आहेत. नवीन रॉकेटच्या डिझाईनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य होऊ शकेल. त्यामुळे अंतराळातील वाहतूक किफाईतशीर खर्चात बनेल.
इस्त्रोचे पीएसएलव्ही रॉकेट हे १९८० मध्ये विकसित करण्यात आले. यात रॉकेट वापरल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. नवीन रॉकेटचे डिझाईन वर्षभरात पूर्ण करण्यात येईल व उत्पादनासाठी ते उद्योगांना दिले जाईल. २०३० मध्ये त्याचे पहिले लँचिंग केले जाईल, असे सोमनाथ म्हणाले.
नवीन रॉकेटमध्ये हरित इंधनाचे मिश्रण असेल. त्यात मिथेन व द्रवरूप ऑक्िसजन किंवा केरोसिन आणि द्रवरूप ऑक्िसजनचा त्यात समावेश असेल. नवीन रॉकेटमुळे अंतराळात उपग्रह सोडण्याचा खर्च १९०० डॉलर्स प्रति किलो असेल. हे रॉकेट पुन्हा वापरता येणारे असेल.