भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला; संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद

भारताच्या तिन्ही सेना ३० ऑक्टोबरपासून सुरू करत असलेल्या 'त्रिशूल' या संयुक्त युद्धाभ्यासाने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजवली आहे. भारताने आधीच 'नोटम' जारी केले असतानाही, पाकिस्तानने इतकी धास्ती घेतली आहे की, त्यांनी आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले आहे.
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला; संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद | Photo : X
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला; संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद | Photo : X
Published on

नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सेना ३० ऑक्टोबरपासून सुरू करत असलेल्या 'त्रिशूल' या संयुक्त युद्धाभ्यासाने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजवली आहे. भारताने आधीच 'नोटम' जारी केले असतानाही, पाकिस्तानने इतकी धास्ती घेतली आहे की, त्यांनी आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले आहे.

पाकिस्तानचे नौदल प्रमुख 'सर क्रीक' क्षेत्राच्या दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर लगेचच पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. भारतीय सेना ३० ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर यादरम्यान राजस्थान आणि गुजरातच्या सीमावर्ती भागांत हा मोठा संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे.

भारतीय सेना, नौदल आणि वायुदलाचा हा संयुक्त युद्धाभ्यास समुद्र आणि वाळवंटी भागांमध्ये होणार आहे. कोणतीही विमाने या अभ्यासाच्या परिघात येऊ नयेत म्हणून भारताने खबरदारी म्हणून आधीच 'नोटम' जारी केले होते. मात्र, भारताच्या या हालचालीमुळे पाकिस्तान इतका बिथरला की, त्याने स्वतःहून या नोटमची व्याप्ती वाढवली आणि जवळजवळ संपूर्ण देशाचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.

बदलली भारताची रणनीती

'ऑपरेशन सिंदूर'नंतर हिंदी महासागरापासून अरबी समुद्रापर्यंत भारतीय सशस्त्र सेना अधिक सक्रिय झाली आहे. अलीकडेच भारतीय वायुसेनेने कोकण किनारपट्टीवर 'ॲडव्हान्स मॅन्ड-अनमॅन्ड टीमिंग'ची यशस्वी चाचणी केली होती आणि आता तिन्ही सेना हा संयुक्त युद्धाभ्यास करणार आहेत. भारताच्या या वाढलेल्या लष्करी तयारीमुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

राजनाथ सिंह यांची चेतावणी

पाकिस्तानने हे पाऊल उचलण्यामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांनी 'सर क्रीक' क्षेत्राला भेट देऊन आपल्या सेनेच्या तयारीचा आढावा घेतला होता. यापूर्वी याच महिन्यात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'सर क्रीक' भागात जाऊन जवानांशी संवाद साधला होता आणि पाकिस्तानकडून सैन्य पायाभूत सुविधा वाढवण्याबद्दल चेतावणी दिली होती.

इतिहास, भूगोल बदलू

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा देताना म्हटले होते की, त्यांनी हे विसरू नये की सर क्रीकचा एक रस्ता कराचीपर्यंत जातो. या क्षेत्रात शत्रूने कोणत्याही प्रकारची हिंमत दाखवल्यास, त्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलला जाऊ शकतो. राजनाथ सिंह यांच्या याच वक्तव्याची चर्चा आता 'त्रिशूल' युद्धाभ्यासाच्या पार्श्वभूमीवर जोर धरू लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in