
संयुक्त राष्ट्र : जोपर्यंत पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीत, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील. पाकिस्तान सातत्याने सिंधू जल कराराचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे आम्हीही स्वस्थ बसू शकत नाही, असे खडे बोल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले आहेत.
पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत, असे भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर (यूएन) स्पष्ट केले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार स्थगित केला आहे.
सहनशीलतेचा अंत
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमध्ये जल करारावरील आरिया फॉर्म्युला बैठकीत भारताचे प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी सिंधू जल करार कधीपर्यंत स्थगित राहील याची माहिती दिली. संयुक्त राष्ट्रांमध्ये पी. हरीश म्हणाले, भारताने ६५ वर्षांपूर्वी अत्यंत सद्भावनेने सिंधू जल करार केला होता. या काळात पाकिस्तानने आमच्याशी तीन वेळा युद्धे केली,
आमच्या देशात हजारो दहशतवादी हल्ले घडवून आणले. त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. त्यांच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये २०,००० भारतीय नागरिक मारले गेले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे त्यापैकी ताजे उदाहरण आहे. परंतु, भारताने नेहमी संयम आणि धीर दाखवला.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारताची डोकेदुखी ठरतोय
पी. हरीश म्हणाले, पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती, युद्धे, दहशतवादी कारवाया चालू असताना दुसऱ्या बाजूला भारताने नेहमीच असाधारण संयम, धीर व उदारता दाखवली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारताची डोकेदुखी ठरतोय. सीमेवरील नागरिकांचे जीवन विस्कळीत राहिले आहे. तेथील आर्थिक विकासासमोर अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या ६५ वर्षांमध्ये धरणांच्या पायाभूत सुविधांमध्ये बरेच बदल झाले आहेत, तंत्रज्ञानही बदलले आहे. तरी काही जुनी धरणे सुरक्षेसंबंधीच्या आव्हानांचा सामना करत आहेत.
पाकिस्तानची आडकाठी पाकिस्तानवर हल्लाबोल करत हरीश म्हणाले, धरणांच्या पायाभूत सुविधा आता विकसित करायला हव्यात. मात्र, नवे बदल व सुविधांच्या विकासास पाकिस्तानने नेहमीच आडकाठी केली आहे. २०१२ मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्म-काश्मीरमधील तुलबूल नेव्हिगेशन प्रकल्पावर हल्ला केला. यामुळे आमचे प्रकल्प थांबले. प्रकल्प व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. तरीही गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही पाकिस्तानबरोबर सिंधू करारातील सुधारणांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमच्या हाती केवळ दहशतवादी हल्लेच आहेत, असेही ते म्हणाले.