देशात बेरोजगारी दरात किंचित वाढ

देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील बेरोजगारीचा दर मे महिन्यात ५.५ टक्क्यांवर नोंदवला गेला. तो मे २०२५ मधील ५.६ टक्क्यांच्या तुलनेत किंचित कमी असला, तरी एप्रिल २०२६ मधील ५.२ टक्क्यांच्या तुलनेत वाढल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) ताज्या ‘नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण’ अहवालातून सोमवारी स्पष्ट झाले.
देशात बेरोजगारी दरात किंचित वाढ
देशात बेरोजगारी दरात किंचित वाढप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील बेरोजगारीचा दर मे महिन्यात ५.५ टक्क्यांवर नोंदवला गेला. तो मे २०२५ मधील ५.६ टक्क्यांच्या तुलनेत किंचित कमी असला, तरी एप्रिल २०२६ मधील ५.२ टक्क्यांच्या तुलनेत वाढल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) ताज्या ‘नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण’ अहवालातून सोमवारी स्पष्ट झाले. सदर अहवालानुसार, मे महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ५.१ टक्क्यांवर पोहोचला असून तो एप्रिलमधील ४.६ टक्क्यांच्या तुलनेत वाढला आहे. उलट, शहरी भागातील बेरोजगारीचा दर ६.६ टक्क्यांवरून, ६.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. विशेष म्हणजे, शहरी बेरोजगारीचा हा मे २०२५ नंतरचा सर्वात नीचांकी स्तर आहे.

श्रमशक्ती सहभाग दर मे महिन्यात ५४.४ टक्क्यांवर नोंदवला गेला. एप्रिलमध्ये तो ५५ टक्के होता. ग्रामीण भागात हा दर ५६.६ टक्के, तर शहरी भागात ४९.८ टक्के राहिला. वर्षभराच्या तुलनेत एकूण श्रमशक्ती सहभाग दरात ०.४ टक्के अंकांची घट झाली आहे. तरी विशेष म्हणजे महिलांच्या सहभाग दरात फारसा बदल दिसलेला नाही. मे २०२६ मध्ये महिला सहभाग दर ३२.८ टक्के राहिला. ग्रामीण भागात तो ३६.७ टक्के, तर शहरी भागात २४.८ टक्के नोंदवला गेला. मात्र, मे २०२५ च्या तुलनेत महिला सहभाग दरात ०.४ अंकांची किरकोळ घट झाली आहे.

दरम्यान, रोजगारित लोकसंख्येचे प्रमाण दर्शविणारे कामगार-लोकसंख्या गुणोत्तर अर्थात ‘वर्कर पॉप्युलेशन रेशो’ मे महिन्यात ५१.४ टक्क्यांवर आला. एप्रिलमध्ये तो ५२.२ टक्के होता. ग्रामीण भागात हा दर ५३.८ टक्के, तर शहरी भागात ४६.६ टक्के राहिला.

logo
marathi.freepressjournal.in