पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना

भारतातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरण उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ११,००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. ही योजना आठ वर्षांसाठी (आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३३-३४) राबवली जाईल.
पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना
पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : भारतातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरण उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ११,००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. ही योजना आठ वर्षांसाठी (आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३३-३४) राबवली जाईल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरण उद्योग हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात या बाजारपेठेचा आकार ९७,००० कोटी रुपये होता; तरीही त्यातील ४५ टक्के भाग हा आयातीवर अवलंबून आहे. प्रगत बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरण क्षेत्रात स्वदेशी क्षमता निर्माण करणे आणि जागतिक बाजारपेठेत भारताला एक प्रमुख देश म्हणून प्रस्थापित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेत पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जाणाऱ्या उपकरणांच्या सात श्रेणींचा समावेश आहे. यामध्ये टनेल बोरिंग मशीन, ऑफ-हायवे ट्रक, एक्सकॅव्हेटर्स, क्रेन, लोडर्स, पायलिंग रिग आणि ड्रिलिंग मशीन यांचा समावेश आहे.

सिल्चरमध्ये नवे विमानतळ; २,०१४ कोटी अंदाजित खर्च

आसाममधील सिल्चर येथील डोलू येथे २,०१४ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या नवीन विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. भारतीय वायुसेना आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या मालकीचे सिल्चर येथील सध्याचे विमानतळ ७० एकर जागेवर पसरलेल्या नागरी क्षेत्रात कार्यरत आहे. वैष्णव यांनी सांगितले की, या नवीन विमानतळाची गर्दीच्या वेळेत (पीक अवर्स) ८०० प्रवाशांची, तर वार्षिक १०.१ लाख (१.०१ दशलक्ष) प्रवाशांची वाहतूक हाताळण्याची क्षमता असेल. या प्रकल्पासाठी २,०१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत संसाधनांमधून या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. या विमानतळामुळे बराक व्हॅली आणि लगतच्या ईशान्येकडील भागाला उत्तम संपर्क सुविधा मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असेही वैष्णव यांनी नमूद केले.

तमिळनाडूतील कामराजार बंदरावर दुसरे कंटेनर टर्मिनल

तमिळनाडूतील कामराजार बंदरावर सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर दुसऱ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४,२८८.२६ कोटी रुपये आहे. या प्रकल्पांतर्गत ९०० मीटर लांबीचे आणि १८ मीटर खोलीचे (डिझाइन ड्राफ्ट) कंटेनर टर्मिनल उभारले जाणार आहे. याची वार्षिक कंटेनर हाताळणी क्षमता २० लाख (२.० दशलक्ष) 'ट्वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स' असेल आणि हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवला जाईल. हा प्रकल्प 'डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर' तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पातील पीपीपी घटकाचा जीएसटीसह अंदाजित खर्च ४,२८८.२६ कोटी रुपये आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी २,४२९.३२ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १,८५८.९४ कोटी रुपये खर्चाचा समावेश आहे. निवडलेल्या विकासकामार्फत या गुंतवणुकीची व्यवस्था केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. बंदरातील गाळ उपसण्यासाठी येणारा ४५० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च कामराजार पोर्ट लिमिटेडकडून स्वतंत्रपणे उचलला जाईल, असेही प्रस्तावात नमूद केले आहे.

टपाल कार्यालय आधुनिकीकरणासाठी १,१४१ कोटी

टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता १,१४१ कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टपाल विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या

या निधीचा वापर टपाल जाळ्याचे (नेटवर्कचे) आधुनिकीकरण करण्यासाठी तसेच पत्रे आणि पार्सल सेवा अधिक बळकट करण्यासाठी केला जाईल. मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांचा दर्जा उंचावणे, पत्रे आणि पार्सल वाहतुकीची मध्यवर्ती साखळी (मिडल माईल लॉजिस्टिक्स) मजबूत करणे आणि सरकारी योजनांची व्याप्ती वाढवणे या बाबींचा समावेश असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)