

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराचे बहुतांश मुद्दे मार्गी लागले असून, सध्या शेवटच्या टप्प्यातील मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत, हा करार लवकरच अंमलात येईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी व्यक्त केला. अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या संभाव्य बैठकीपूर्वी या कराराबाबत मोठी घडामोड घडल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अंतिम टप्प्यात वाटाघाटी
कराराबाबत जयशंकर म्हणाले, आम्ही आता अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत, यात कोणतीही शंका नाही. उर्वरित मुद्द्यांपैकी अनेक प्रश्न आमच्या बाजूने नसून अमेरिकेच्या बाजूने अधिक बदल झाले आहेत. तसेच, हा करार लवकरच पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. अंतिम टप्प्यात सर्वांचाच संयम सुटतो, हे साहजिक आहे, असेही ते म्हणाले.
कराराचे महत्त्व
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार शुल्कातील अडथळे दूर करणे आणि द्विपक्षीय बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करण्यासाठी २०२५ च्या सुरुवातीपासून चर्चा सुरू आहे. भारताला अमेरिकन बाजारपेठेत प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत चांगल्या शुल्काचे लाभ हवे आहेत. आम्हाला असा व्यापार करार हवा आहे जो फायदेशीर, संतुलित आणि इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आपल्याला स्पर्धात्मक फायदा देणारा असेल, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा बाजारपेठ असलेला देश असून, अशा अर्थव्यवस्थेशी करार झाल्यास देशाला मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील भारत आणि अमेरिका व्यापार करार अंतिम करण्याच्या खूप जवळ असल्याचे सांगितले होते. दोन्ही देशांमधील ही आर्थिक भागीदारी भविष्यात द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.