
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यात आता लवकरच व्यापार करार होणार असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले ५० टक्के आयातशुल्क कमी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. भारत आणि अमेरिका आयातीवरील शुल्क १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी व्यापार कराराच्या जवळ पोहोचले आहेत अशी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावत जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादले. भारतावरही एकूण ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. एवढ्यावरच न थांबता ट्रम्प यांनी भारताला अनेकदा डिवचण्याचाही प्रयत्न केला. मात्र, भारताने अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला जुमानले नाही. यानंतर अखेर ट्रम्प हे नरमल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि अमेरिका आयातीवरील शुल्क १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी व्यापार कराराच्या जवळ पोहोचले आहेत अशी माहिती समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार रखडला आहे. मात्र, दीर्घकाळापासून रखडलेला हा व्यापर करार आता लवकरच पूर्ण होणार असून त्या करारामुळे भारतीय आयातीवरील अमेरिकन शुल्क ५० टक्क्यांवरून १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, ऊर्जा आणि शेतीवर अवलंबून असलेल्या या करारामुळे भारत हळूहळू रशियन कच्च्या तेलाची आयात कमी करू शकतो. मात्र, यावर अद्याप भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, त्यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. ही चर्चा मुख्यत्वे व्यापारावर केंद्रित होती. ऊर्जा या विषयावरही चर्चा झाली. यावेळी मोदींनी त्यांना आश्वासन दिले की, भारत रशियाकडून तेल खरेदी मर्यादित करेल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या रशिया भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ३४ टक्के पुरवठा करतो, तर देशाच्या तेल आणि वायूच्या गरजांपैकी सुमारे १० टक्के (मूल्यानुसार) अमेरिकेतून येतो.
ऊर्जेच्या बाबतीत भारत हळूहळू रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करू शकतो आणि अमेरिकेतून इथेनॉल आयात करण्यास परवानगी देऊ शकतो. त्याऐवजी वॉशिंग्टन ऊर्जा व्यापारावर सवलती देऊ शकेल अशी अपेक्षा आहे. या व्यापार करारावर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीदरम्यान आसियान शिखर परिषदेत द्विपक्षीय व्यापार कराराची अंतिम करण्याची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी साजरी केली व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी केली. त्यांनी भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत व्यापार आणि पाकिस्तान या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले.
आम्ही व्यापाराबद्दल बललो, त्यांना त्यामध्ये जास्त रस होता. आम्ही यापूर्वी पाकिस्तानसोबत युद्ध नको याबाबत थोडे बोललो होतो. त्या संभाषणातही व्यापाराचा मुद्दा होताच. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झालेले नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. गेल्या काही वर्षात ते माझे चांगले मित्र झाले आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, चीनच्या टॅरिफबाबत ट्रम्प म्हणालेकी, येत्या एक नोव्हेंबरपासून चीन स्वतःवर १५५ टक्के टॅरिफ लादून घेणार आहे. मला ते त्यांच्यासाठी योग्य आहे असे वाटत नाही. मी चीनसोबत चांगले राहू इच्छितो. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्यासोबत वाईट वागत आहे कारण आपले आधीचे राष्ट्रपती व्यापाराच्या दृष्टिकोनातून तेवढे स्मार्ट नव्हते.
ट्रम्प यांनी मध्यपूर्व मधील परिस्थितीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, आम्हाला संपूर्ण जगभरात शांतता हवी आहे. आम्हाला सर्वांना सोबत घ्यायचे आहे. मला मध्यपूर्वमधून कॉल आला होता. आम्ही तेथे चांगली कामगिरी करत आहोत. मध्यपूर्वमधील अनेक देशांनी शांततेसाठी करार केला आहे. कोणालाही हे शक्य होईल असे वाटले नव्हते.