व्यापार करारात देशाचे हित अबाधित! केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची माहिती

अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेसोबत भारताला चांगला व्यापार करार मिळाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केले.
व्यापार करारात देशाचे हित अबाधित! केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची माहिती
(Photo-X/@PiyushGoyal)
Published on

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापार करारात देशाच्या हिताशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. देशातील शेती व डेअरी उद्योगांचे हितरक्षण करण्यात आले आहे. अन्य देशांच्या तुलनेत अमेरिकेसोबत भारताला चांगला व्यापार करार मिळाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केले.

भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा सोमवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर भारतातर्फे मंगळवारी मंत्री गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन या कराराची माहिती दिली.

ते म्हणाले की, अमेरिका व भारतादरम्यान कोणत्या विषयावर सहमती झाली याबाबतचा तपशील लवकरच भारत-अमेरिकेकडून संयुक्त निवेदनाद्वारे जाहीर करण्यात येईल. संसदेत हा करार मांडायचा होता, पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे तो मांडता आला नाही.

वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेशी अपेक्षित व्यापार करार पूर्ण केला आहे आणि संपूर्ण देश त्यांचे अभिनंदन करत आहे. भारताला अमेरिकेशी चांगला करार मिळाल्याचे मुख्य कारण पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंध आहेत.

गोयल म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील गरीब, मच्छीमार, शेतकरी आणि तरुणांसाठी मोठ्या संधी खुल्या होतील. या करारानुसार भारतीय वस्तूंवरील परस्पर टॅरिफ ५० वरून १८ टक्क्यांवर येईल. या कराराचा फायदा कपडे, अभियांत्रिकी, ज्वेलरी विभागाला होणार आहे.

हा करार देशासाठी शुभसंकेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारताचे पथक हे अमेरिकन अधिकारी व मंत्र्यांशी चर्चा करत होते. अनेक कठीण विषय होते. भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले होते. उद्योगविश्व, शेतकऱ्यांना त्रास होत होता. कापड उद्योगासाठी टॅरिफचे दर कमी होणे गरजेचे होते, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांना खूश करण्यासाठी मोदींची शरणागती - काँग्रेस

भारताचा युरोपियन महासंघ व अमेरिकेशी झालेल्या व्यापार करारांची सविस्तर माहिती संसदेत सादर करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. वॉशिंग्टनमध्ये मोगॅम्बो खूश झाला आहे. त्यामुळे असे दिसते की, पंतप्रधान मोदी यांनी शरणागती पत्करली आहे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली. भारताला आपल्या निर्णयांची माहिती ट्रम्प किंवा त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींकडून मिळत आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली, अशी जोरदार टीका काँग्रेसने केली.

राहुल हे भारताच्या प्रगतीविरोधात

काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष देशाला चुकीची माहिती देत आहेत. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधींची मानसिकता नकारात्मक आहे आणि ते भारताच्या प्रगतीच्या विरोधात आहेत, असा आरोप गोयल यांनी केला.

...त्यामुळे टॅरिफ कपातीची घोषणाही अमेरिकेतून

व्यापार करार कपातीची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी का केली, असा प्रश्न विरोधी पक्षनेत्याने विचारला होता, त्यावर गोयल म्हणाले की, टॅरिफ हे अमेरिकेने लावले होते, त्यामुळे टॅरिफ कमी करण्याची घोषणाही तिथूनच झाली पाहिजे. याबाबत मी ट्रम्प यांचे आभार मानतो. येत्या काळात भारत आणि अमेरिका यांचे संबंध अधिक मजबूत होतील, असे गोयल म्हणाले.

तेल खरेदीबाबत भारताने अधिकृत कळवले नाही

रशियन तेल खरेदी बंद करण्याबाबत भारताने अधिकृतपणे काहीही कळवलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याचे विश्लेषण केले जात आहे, अशी माहिती ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in