

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेच्या मुख्य चर्चाकारांनी मंगळवारी येथे प्रस्तावित अंतरिम व्यापार कराराच्या तपशिलांना अंतिम रूप देण्यासाठी तीन दिवसीय चर्चेची फेरी सुरू केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या कराराचा आराखडा फेब्रुवारी महिन्यात निश्चित करण्यात आला होता.
अमेरिकेच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य चर्चाकार ब्रेंडन लिंच करत आहेत, तर भारताचे मुख्य चर्चाकार वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव दर्पण जैन हे आहेत.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या येथील ‘वाणिज्य भवन’मध्ये ही चर्चा सुरू आहे. दोन्ही देश अंतरिम व्यापार कराराच्या तपशिलांना अंतिम रूप देण्याचा आणि व्यापक द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
७ फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याची किंवा अंतरिम व्यापार कराराची रूपरेषा अंतिम करण्यासाठी संयुक्त निवेदन जारी केले होते.
या आराखड्यानुसार, अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे मान्य केले होते. अमेरिकेने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतीय वस्तूंवर लावलेले २५ टक्के शुल्क हटवले होते आणि या करारानुसार उर्वरित २५ टक्के शुल्क कमी करून ते १८ टक्क्यांवर आणले जाणार होते.
यंदाच्याच २० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘रेसिप्रोकल टॅरिफ्स’ (परस्पर आयात शुल्क) च्या व्यापक निर्णयाविरुद्ध निकाल दिला.