
नवी दिल्ली : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने रविवारी आणखी एक मोठे पाऊल उचलले असून चिनाब नदीवरील बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह भारताने रोखला आहे.
पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर, आता भारताने जम्मूतील रामबन येथे बांधलेल्या बागलिहार धरणाचे चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. दुसरीकडे, काश्मीरमधील झेलम नदीवरील किशनगंगा धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणीदेखील रोखण्याची तयारी भारताने सुरू केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामुळे अनेक करार रद्द किंवा स्थगित करण्यात येत आहे. आता, भारत सरकार जम्मूतील रामबनमधील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणातून आपल्या बाजूने पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करू शकतो. याचा अर्थ असा की, या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करता येणार आहे.
सिंधू जल कराराअंतर्गत, पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, चिनाब आणि झेलम) नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे ९३ टक्के पाणी हे सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी वापरतो. पाकिस्तानातील सुमारे ८० टक्के शेतजमीन या पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका महत्त्वाची आहे. भारताने पाणीस्ट्राइकचे अस्त्र उगारल्यानंतर पाकिस्तान भारताला सतत युद्धाच्या धमक्या देत आहे.
हवाई दल प्रमुखांनी घेतली मोदींची भेट
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर रविवारी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ७ लोककल्याण मार्ग येथील मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तत्पूर्वी, नौदल प्रमुख ॲॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी शनिवारी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांना अरबी समुद्रातील महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या एकूण परिस्थितीची माहिती दिली होती.
पीओकेमध्ये दोन महिन्यांचे रेशन जमा करण्याचे आदेश
भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करेल, या भीतीने आता पाकव्याप्त काश्मिरात ‘एलओसी’जवळ राहणाऱ्या लोकांना आता रेशन आणि खाण्यापिण्याचे सामान भरून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. एलओसीजवळील १३ मतदारसंघांत दोन महिन्यांसाठी अन्नधान्याची साठवणूक करण्याचे निर्देश ‘पीओके’चे पंतप्रधान चौधरी अन्वर उल हक यांनी दिले आहेत. “स्थानिक सरकारने १३ मतदारसंघ क्षेत्रांत अन्न, औषधे आणि अन्य सर्व पायाभूत गरजेच्या वस्तू भरून ठेवण्याचे आदेश दिले असून त्यासाठी एक अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी तयार ठेवण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक
अमृतसर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्र आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक करण्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे. शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांचे नावे आहेत. याविषयी पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव म्हणाले की, “प्राथमिक तपासात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी या दोन आरोपींचे संबंध असल्याचे उघड झालं आहे. हे संबंध अमृतसर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू याच्या माध्यमातून स्थापित झाले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”