
नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांना 'सर्वोत्तम युद्ध सेवा पदका'ने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हवाई दलाच्या नऊ अधिकाऱ्यांना 'वीर चक्र' देऊन गौरविण्यात येणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे. हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी, हवाई दलाचे पश्चिम विभागाचे कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, एअर मार्शल अवधेश भारती यांना गौरविण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांसोबतच लष्कराच्या दोन व नौदलाच्या एका अधिकाऱ्याचा आज (१५ ऑगस्ट) सन्मान करण्यात येणार आहे.
९ हवाई दल अधिकाऱ्यांना 'वीर चक्र'
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये मुरीदके आणि बहावलपूर येथे दहशतवादी तळावर व पाकिस्तानी सैन्याच्या मालमत्तेवर लक्ष्य केल्याबद्दल भारतीय हवाई दलाच्या ९ वैमानिकांना 'वीर चक्र' देऊन सन्मानित केले जाणार आहे. ग्रुप कॅप्टन रणजीत सिंग सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, ग्रुप कॅप्टन अनिमेश पाटणी, ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लिडर सार्थक कुमार, स्क्वाड्रन लिडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लिडर रिझवान मलिक, फ्लाईट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर आदींना 'वीर चक्र' पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
२६ अधिकाऱ्यांना 'हवाई दल सेना पदक'
भारतीय हवाई दलाच्या २६ अधिकाऱ्यांना व हवाई सैनिकांना 'हवाई दल सेना पदक' (वीरता) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानातील लक्ष्य भेदणाऱ्या मोहिमेत सहभागी झालेले लढाऊ वैमानिक व 'एस-४००' व हवाई संरक्षण प्रणालीचे संचलन करणाऱ्यांना हे पदक दिले गेले.
बीएसएफच्या १६ जणांना 'वीरता पदक'
सीमा सुरक्षा दलाने 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये शौर्य गाजवल्याबद्दल आपल्या १६ सैनिकांना 'वीरता पदक' देण्याचा निर्णय घेतला. उपकमांडंट अधिकारी, दोन सहायक कमांडंट आणि एक निरीक्षकाचा यात समावेश आहे.
शशांक तिवारी यांना मरणोत्तर 'कीर्ति चक्र'
लष्कराचे लेफ्टनंट शशांक तिवारी यांना मरणोत्तर 'कीर्ति चक्र' पदकाने सन्मानित केले जाणार आहे. तिवारी हे कर्तव्यावर असताना आपला सहकारी अग्नीवीर सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी गेले असताना शहीद झाले. ते अवघे २३ वर्षांचे होते. लष्करी सेवेत दाखल होऊन तिवारी यांना केवळ ६ महिने झाले होते.
दोन आयपीएस, ६१५ महाराष्ट्र पोलिसांना विशेष सेवा पदक
मुंबई : 'आयपीएस' अधिकारी निलोत्पाल, यतीश देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस दलातील ६१५ पोलिसांना नक्षल कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या लक्षणीय प्रयत्नांसाठी विशेष सेवा पदक देण्यात येणार आहे. निलोत्पाल हे सध्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक तर यतीन देशमुख यांनी पूर्वी महाराष्ट्राच्या पूर्वेकडील नक्षलग्रस्त जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षक (परिचलन) म्हणून काम केले आहे.