भारतीय वायुसेनेचे सुखोई विमान कोसळले; महाराष्ट्रातील फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा मृत्यू; स्क्वाड्रन लीडर अनुजही मृत्युमुखी

आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेल्या भारतीय वायुसेनेच्या सुखोई या लढाऊ विमानाचा अपघात झाल्याचे वायुसेनेकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा मृत्यू झाला असून २८ वर्षीय पूर्वेश दुरुगकर हे नागपूरचे सुपुत्र होते.
भारतीय वायुसेनेचे सुखोई विमान कोसळले; महाराष्ट्रातील फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा मृत्यू; स्क्वाड्रन लीडर अनुजही मृत्युमुखी
Published on

नवी दिल्ली : आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेल्या भारतीय वायुसेनेच्या सुखोई या लढाऊ विमानाचा अपघात झाल्याचे वायुसेनेकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा मृत्यू झाला असून २८ वर्षीय पूर्वेश दुरुगकर हे नागपूरचे सुपुत्र होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पूर्वेश दुरुगकर यांनी फायटर पायलट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

वायुसेनेने गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ९ मिनिटांनी विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ९.१४ वाजता करण्यात आलेल्या आणखी एका पोस्टमध्ये दोन्ही वैमानिक शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले. अपघाताच्या वेळी हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते. उड्डाणादरम्यान अचानक विमानाचा ग्राउंड कंट्रोलशी संपर्क तुटल्याने वायुसेनेने तत्काळ अलर्ट जारी केला. रडारशी संपर्क तुटल्यानंतर भारतीय वायुसेनेने त्वरित शोधमोहीम सुरू केली, चौकशीसाठी विशेष टीम आसाममध्ये पाठवण्यात आली. विमानाचा संपर्क तुटण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पूर्वेश यांचे शिक्षक नरेंद्र पलांदूरकर यांनी सांगितले की, पूर्वेशला लहानपणापासून विमानचालनाची आवड होती. तो स्वतः छोटे-मोठे ड्रोन बनवत असे. त्या आवडीमुळेच पुढे तो वायुसेनेत दाखल झाला. अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पूर्वेश दुरुगकर यांनी फायटर पायलट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दुरुगकर यांना लहानपणापासून हवाईदलाचे आकर्षण

नागपूरच्या न्यू सुभेदार लेआऊट परिसरातील रहिवासी असलेले फ्लाइट लेफ्ट. पूर्वेश दुरुगकर यांना बालपणापासूनच हवाई दलाचे आकर्षण होते. त्यांनी २०१५ मध्ये भंडारा येथील डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमधून सैनिकी प्रशिक्षणासोबत अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१७ मध्ये नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयातून बीएससी पदवी मिळवली. यानंतर त्यांनी हवाई दलातील करिअरसाठी आवश्यक असलेली ‘ॲफकॅट’ परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला.

logo
marathi.freepressjournal.in