जयपूर : भारतीय लष्कर भविष्यासाठी सज्ज यादृष्टीने वाटचाल करत असून स्वदेशी उपकरणांची गरज ही ‘धोरणात्मक आवश्यकता’ असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरुवारी सांगितले.
लष्कर दिन परेडनंतर जयपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘भारतीय लष्कर हे प्रशिक्षित सैनिक, आधुनिक उपकरणे आणि बहुआयामी कार्यक्षमतेसह भविष्यासाठी तयार असलेले दल म्हणून पुढे येत आहे. सैनिक अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.’
गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराच्या विचारसरणीत स्पष्ट बदल झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे एक ‘नवीन चेतना’ निर्माण झाल्याचे सांगत ते म्हणाले, ‘या मोहिमेने वेग, समन्वय आणि अचूकतेसह प्रतिसाद देण्याची भारतीय लष्कराची क्षमता दाखवून दिली. ही मोहीम परिपक्व आणि आत्मविश्वासपूर्ण दलाचे प्रतिबिंब होती, जे मोजक्या, ठाम आणि जबाबदार कृतीद्वारे राष्ट्रीय हितांचे संरक्षण करू शकते. आम्ही केवळ सध्याच्या आव्हानांनाच सामोरे जात नाही, तर भविष्यातील युद्धांसाठीही तयारी करत आहोत. त्या दृष्टीने नवी रचना उभी केली जात असून भविष्यातील गरजांनुसार त्यांना सुसज्ज आणि प्रशिक्षित केले जात आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘भैरव बटालियन’ आणि ‘शक्ती बाण रेजिमेंट’ या नव्या युनिट्स उभारण्यात आल्या आहेत. यातून भविष्यातील आव्हानांशी सुसंगत, चपळ, प्रतिसादक्षम आणि ध्येयाभिमुख लष्करनिर्मितीचे प्रतिबिंब दिसते. आजच्या परेडमध्ये परंपरा आणि परिवर्तन यांचा सुंदर संगम दिसून आल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, नेपाळ आर्मी बँडने दोन्ही देशांमधील दृढ संबंध दर्शवले, तर नव्या युनिट्सनी लष्कराची उदयोन्मुख ताकद दाखवून दिली. ‘मेड इन इंडिया’ उपकरणांच्या प्रदर्शनामुळे परेडमध्ये आत्मनिर्भरतेवर आधारित परिवर्तनाचा पाया दिसून आल्याचे ते म्हणाले. ‘भविष्यात लष्कराला अशी उपकरणे हवी आहेत, जी भारतातच डिझाइन आणि विकसित केली जातील. स्वदेशीकरण हे केवळ उद्दिष्ट राहिले नसून आज ते धोरणात्मक आवश्यकता बनले आहे,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आजचे युद्ध किती काळ चालेल हे रणांगणावरच कळेल!
‘भविष्याचा अचूक अंदाज लावता येत नसल्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे अत्यावश्यक आहे. आजचे युद्ध चार दिवस चालेल की चार वर्षे, हे केवळ रणांगणावरच कळेल,’ असेही त्यांनी नमूद केले.