वीरांच्या शौर्याला भारतीय लष्कराचे अनोखे वंदन; लष्कराच्या जाँबाज अधिकाऱ्यांचे कारगीलच्या दिशेने कूच

कारगिल युद्धातील विजयाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने युद्धातील वीरांच्या शौर्याला वंदन करण्याबरोबरच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी भारतीय लष्कराने एक आगळीवेगळी मोहीम आखली आहे.
वीरांच्या शौर्याला भारतीय लष्कराचे अनोखे वंदन; लष्कराच्या जाँबाज अधिकाऱ्यांचे कारगीलच्या दिशेने कूच

सुचिता देशपांडे/मुंबई

कारगिल युद्धातील विजयाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने युद्धातील वीरांच्या शौर्याला वंदन करण्याबरोबरच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी भारतीय लष्कराने एक आगळीवेगळी मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत भारताच्या लष्कराच्या तीन संघांनी तिन्ही दिशांकडून मोटारसायकलीने कारगीलच्या दिशेने कूच केले आहे. भारताने पाकिस्तानवर कारगील युद्धात २६ जुलै १९९९ रोजी ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयाच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्ताने भारतीय लष्कराने मोटारसायकल मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत देशाच्या तीन कोपऱ्यांतून प्रत्येकी आठ मोटारसायकलस्वारांचे तीन संघ सहभागी झाले आहेत. त्यांनी मागील १२ जून रोजीच कारगीलच्या दिशेने प्रयाण केले आहे. या आगळ्या मोहिमेत पूर्वेकडून आसामच्या दिब्रूगढ येथील दिन्जन येथून एक संघ, पश्चिमेकडील द्वारका येथून दुसरा संघ आणि दक्षिणेकडून धनुषकोडीपासून तिसरा संघ सहभागी झाला आहे.

मोटारसायकलस्वारांची पहिली तुकडी पूर्वेकडील मार्गाने- दिन्जन ते दिल्ली, जोरहाट, गुवाहाटी, बिनागुरी, कटिहार, दानापूर, गोरखपूर, लखनौ आणि आग्रामार्गे सुमारे २४८९ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. दुसरी तुकडी पश्चिमेच्या ध्रांगध्रा मार्गे द्वारका ते दिल्ली, अहमदाबाद, उदयपूर, जोधपूर, अजमेर, जयपूर आणि अल्वार असा सुमारे १५६५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिसऱ्या तुकडीने धनुषकोडीपासून आपला प्रवास सुरू केला असून ती मदुराई, कोईम्बतूर, बंगळुरू, अनंतपूर, हैदराबाद, नागपूर, भोपाळ, ग्वाल्हेर आणि अल्वार अशी मजल दरमजल करीत सुमारे २९६३ किलोमीटरचा पल्ला पार करेल.

देशाच्या तिन्ही दिशांकडून आलेले संघ दिल्लीत एकत्र भेटतील. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया गेटजवळील नॅशनल वॉर मेमोरियलहून हे संघ दोन वेगवेगळे मार्ग अनुसरत द्रासच्या दिशेने २७ जून रोजी कूच करतील. एक तुकडी अंबाला, अमृतसर, जम्मू, उदमपूर आणि श्रीनगर मार्गे १,०८५ किमी अंतर पार करेल, तर दुसरी तुकडी चंडीमंदिर, मनाली, सर्चू, न्योमा, तांगत्से आणि लेह मार्गे १,५०९ किमी अंतर पूर्ण करेल. या मोहिमेचा शेवट द्रास येथील गन हिल येथे होईल.

भारतीय लष्कराच्या साहसाचे प्रतीक असलेले हे रायडर्स वेगवेगळ्या प्रांतातील आव्हानात्मक मार्गावरून प्रवास करणार आहेत. त्यांच्या मार्गात ते कारगील युद्धातील वीर, ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भेटतील. या मार्गावरील युद्धस्मारकांना भेट देत आदरांजली अर्पण करतील. तसेच, युवावर्गाला सैन्य दलांमध्ये दाखल होण्याकरिता प्रोत्साहित करतील. या प्रवासादरम्यान प्रमुख ठिकाणी ध्वजवंदन समारंभ ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या आणि प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत होतील, त्यावेळी या मोटारसायकलस्वारांचा सन्मानही केला जाईल.

लष्कराचे शौर्य, देशभक्ती

या मोहिमेचे नेतृत्व लष्कराच्या तोफखानाच्या रेजिमेंटकडून केले जात आहे, ज्या रेजिमेंटने ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी होण्याकरिता महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतीय लष्कराच्या या डी-फाइव्ह मोटारसायकल मोहिमेचे मुख्य समन्वयक लेफ्ट. कर्नल मनोज नायर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘ही मोहीम म्हणजे शहिदांना केवळ श्रद्धांजली नसून भारतीय लष्कराच्या देशभक्ती, शौर्य, त्यागाची गौरवगाथा आहे.’

logo
marathi.freepressjournal.in