
नवी दिल्ली : ‘ॲॅक्सिओम-४’ या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणाऱ्या मोहिमेला अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आतापर्यंत तीन वेळा ही मोहीम पुढे ढकलली आहे. आता येत्या १९ जूनला भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह तीन अंतराळवीर प्रयाण करणार आहेत, असे ‘इस्रो’ने सांगितले.
‘ॲॅक्सिओम’ अंतराळ मोहीम नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रावरून ११ जूनला सुरू होणार होती. मात्र, यानातून इंधन गळती झाल्याने ते प्रक्षेपण पुढे ढकलले. आता ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. आता ‘ॲॅक्सिओम’ मोहीम १९ जूनपासून सुरू होईल. ही मोहीम पहिल्यांदा २९ मे, त्यानंतर ८ जून, त्यानंतर १० जून, नंतर ११ जून रोजी निघणार होती. पण त्यात वेळोवेळी तांत्रिक अडचणी येत गेल्या. नासाचे माजी अंतराळवीर व ‘ॲॅक्सिओम स्पेस’चे संचालक पेग्गी व्हिटसन यांच्याकडे या मोहिमेची जबाबदारी आहे, तर ‘इस्रो’चे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे वैमानिक असतील.