नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) १८ दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्य १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहिले. त्यानंतर चारही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्थानकामधून सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते.
शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीरांचे अंतराळयान मंगळवारी कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग झाले. या सर्वांनी ही मोहीम यशस्वी पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्रकिनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारे यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे १० दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार असून, यादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.
डेटा संकलित
शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६० हून अधिक संशोधनांचा डेटा संकलित केला आहे. हा डेटा घेऊन अंतराळवीरांचे लँडिंग झाले. हे चारही अंतराळवीर २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४.०१ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. सोमवारी शुक्ला यांना घेऊन जाणारे स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान आणि स्टेशनमधील हॅच (दरवाजा) सुरक्षितपणे बंद केल्यानंतर, यशस्वीरीत्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापासून वेगळे झाले होते. दोन 'सेपरेशन बर्न्स' पूर्ण करून ड्रॅगन अंतराळयान 'आयएसएस'पासून दूर झाले.
यानंतर, स्टेशनपासून आणखी अंतर राखण्यासाठी चार नियोजित 'डिपार्चर बर्न्स'पैकी पहिला बर्न, ज्याला 'डिपार्ट बर्न झीरो' म्हटले जाते, तो पार पाडला. पाच मिनिटांनंतर, यानाने दुसरा डिपार्चर बर्न पूर्ण केला. हे क्षेत्र स्थानकाच्या जवळ येणाऱ्या आणि दूर जाणाऱ्या यानांना सुरक्षित अंतर राखण्यासाठी तयार केले आहे. 'नासा'च्या निवेदनानुसार, ड्रॅगन यान आपल्यासोबत ५८० पौंडांपेक्षा जास्त वजनाचे सामान परत आणेल. यामध्ये 'नासा'चे हार्डवेअर आणि मोहिमेदरम्यान केलेल्या ६० हून अधिक प्रयोगांमधून मिळालेला डेटा समाविष्ट आहे.
'स्प्लॅशडाऊन'नंतर पुढे काय?
'स्प्लॅशडाऊन'नंतर आता शुक्ला यांच्यासाठी सुमारे सात दिवसांचा पुनर्प्राप्ती कार्यक्रम सुरू होईल. एका वैद्यकीय तज्ज्ञाच्या देखरेखीखाली हे पुनर्वसन केले जाईल, ज्यामुळे त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी पुन्हा जुळवून घेण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, 'नासा'ने पुष्टी केली आहे की, ड्रॅगन अंतराळयान महत्त्वपूर्ण संशोधन साहित्य घेऊन परतले आहे, ज्यामुळे या मोहिमेचे विज्ञानातील योगदान अधिक अधोरेखित होते.
मायक्रोअल्गीवर प्रयोग
शुक्ला यांनी मायक्रोअल्गी नावाच्या सूक्ष्म वनस्पतीवर केंद्रित असलेल्या एका प्रकल्पात भाग घेतला. त्यांनी या वनस्पतीचे नमुने गोळा करणे आणि ते जतन करण्याचे काम केले. या मायक्रोअल्गीमध्ये भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि इंधन पुरवण्याची क्षमता असू शकते. या मायक्रोअल्गीच्या कणखर स्वरूपावर प्रकाश टाकत म्हटले आहे की, मानवाला पृथ्वीबाहेरील वातावरणात राहण्यासाठी या वनस्पती महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
अभिमानाचा क्षण
‘इस्रो’ आणि ‘नासा’च्या ‘मिशन ॲक्सिओम-०४’अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले शुभांशू शुक्ला सुखरूप परतले. भारत देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. शुभांशू शुक्ला यांच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शुक्ला यांच्यावर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
‘गगनयान’ मोहिमेला मिळणार बळ
शुभांशू शुक्ला यांनी पृथ्वीवर परतण्यासाठी २३ तासांचा प्रवास केला आहे. त्यांच्यासोबत चार अंतराळवीर २५ जूनपासून अंतराळात गेले होते. २६ जून रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे शुभांशू शुक्ला यांनी ६० हून अधिक शास्त्रीय प्रयोग केले. त्यामध्ये अंतराळात स्नायूंचे होणारे नुकसान, मानसिक आरोग्य आणि अंतराळात धान्य रुजवण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. आपल्या ‘गगनयान’ या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे.
अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने एक मैलाचा दगड - मोदी
शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी म्हटले आहे की, “ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवर परतल्याबद्दल त्यांचे मी स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून, त्यांनी त्यांच्या समर्पण, धैर्याने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली. हा आपल्या अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड आहे.
आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. शुभांशू शुक्ला हे सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले.