

नवी दिल्ली : इराणमधील स्थिती गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण बनल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतच्या आपल्या सर्व नागरिकांना तातडीने इराण सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे सध्या इराणमध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारविरोधी आंदोलनादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खामेनी यांनी अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकाही इराणविरोधात कधीही लष्करी कारवाई सुरू करेल, असे दावे केले जात आहेत.
भारतीय दूतावासाने तेहरानमधून प्रसिद्ध केलेल्या या सूचनेमध्ये म्हटले आहे की, इराणमधील बदलती स्थिती पाहता सद्य:स्थितीत इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना प्राप्त असलेल्या वाहतुकीच्या कोणत्याही साधनाच्या माध्यमातून इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.