भारतीय कफ सिरपने ६६ बालकांचा बळी; डब्ल्यूएचओकडून मेडिकल अलर्ट जारी

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले की, ज्या चार उत्पादनांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली
भारतीय कफ सिरपने ६६ बालकांचा बळी; डब्ल्यूएचओकडून मेडिकल अलर्ट जारी

भारतातील ‘मेडेन फार्मास्युटिकल्स’ने बनवलेल्या खोकला आणि सर्दीच्या सिरपमुळे गांबियामध्ये ६६ बालकांच्या मृत्यू झाला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केला आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये मेडेन फार्मास्युटिकल्सच्या खोकला आणि सर्दी सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची जास्त मात्रा आढळून आली, जी धोकादायक आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने आपल्या अहवालात या उत्पादनाबाबत अलर्टही जारी केला आहे.गांबियामध्ये आतापर्यंत अशी वादग्रस्त उत्पादने आढळून आली असून आता ती इतर देशांमध्ये देखील वितरित केली जाऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतच्या तपासणीसाठी सिरपच्या चार उत्पादनांचे नमुने तपासण्यात आले.

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गांबियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू पावलेल्या मुलांनी खोकल्याचे सिरप प्यायले होते, त्यामुळे त्यांच्या किडनीला धोका निर्माण झाला. यामुळे तेथील सरकारने या मृत्यूंमागील कारणांचा शोध सुरू केला असता या सिरपमुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता आढळून आली.

भारत सरकारकडून चौकशी सुरू

‘डब्ल्यूएचओ’च्या अलर्टनंतर भारत सरकारने हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल या औषध कंपनीची चौकशी सुरू केली आहे. ‘डीजीसीआय’ने हरियाणा ड्रग्ज रेग्युलेटरीकडून याबाबत सविस्तर अहवालही मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे की, केंद्र अशा प्रकरणांवर लक्ष ठेवते. केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे आल्यास लक्ष घालू.

चार उत्पादनांमध्ये भारतातील सिरप

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले की, ज्या चार उत्पादनांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यात मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने बनवलेल्या खोकला आणि सर्दीवरील सिरपचा समावेश आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने रुग्णांचे आणखी नुकसान टाळण्यासाठी सर्व देशांमध्ये ही उत्पादने शोधून ती काढून टाकण्याची शिफारस केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in